स्वच्छतेचे खरे दिपवाले,वनराई मित्र मंडळाचा हृदयस्पर्शी उपक्रम

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

सणांच्या झगमगाटात आणि दिव्यांच्या उजेडातही काही माणसे अशी असतात जी दररोज पहाटेपासून आपले गाव, आपली गल्ली, आपली कॉलनी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मेहनत घेतात. त्या निस्वार्थ कर्मयोग्यांचा सन्मान करण्याचा सुंदर उपक्रम वनराई मित्र मंडळ, मस्करनीस कॉलनी क्रमांक १ यांनी यंदाही पुढे चालवला आहे.

 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीच्या निमित्ताने मंडळातर्फे नगरपरिषदेचे सफाई कामगार बांधवांना भेटवस्तू, फराळ आणि बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. “स्वच्छतेचे खरे दीपवाले” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कर्मयोग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली, तर उपस्थितांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव दाटून आले.

 

या छोट्याशा पण अर्थपूर्ण कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील मानवी संवेदनशीलता. मंडळाचे सभासद मनोहर हेटे, धोंडीराम राऊत, ज्ञानेश्वर दळवी, आशुतोष महांगडे, राहुल कुलकर्णी, विशाल राऊत, गीता राऊत आणि सपना राऊत आदींनी स्वखर्चाने व मनापासून हा कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक सफाई कामगाराला प्रेमाने ओवाळून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी स्नेह, आदर आणि कृतज्ञतेचा संगम अनुभवायला मिळाला.

Advertisement

 

वनराई मित्र मंडळाचे हे कार्य केवळ दिवाळी साजरी करण्यापुरते मर्यादित नाही, तर समाजातील प्रत्येक घटकाप्रती असलेली आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी दर्शवते. आजच्या काळात जेव्हा सणांचा अर्थ फक्त फटाके, शॉपिंग आणि मेजवानी इतकाच राहिला आहे, तेव्हा या मंडळाने दिलेला “सामाजिक संवेदनांचा” संदेश प्रेरणादायी ठरतो.

 

मंडळाचे सदस्य सांगतात, “आपल्या परिसराची स्वच्छता ही केवळ या कामगारांची जबाबदारी नाही, ती आपलीही आहे. त्यांना आदर देणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान करणे.

 

सकाळच्या पहिल्या किरणांप्रमाणेच या उपक्रमाने तळेगावातील वातावरणात एक प्रसन्न, मानवतेने उजळलेली भावना निर्माण केली. मस्करनीस कॉलनीतील हा सुंदर उपक्रम केवळ एका मंडळाची परंपरा नाही, तर समाजातील आपुलकीची आणि कृतज्ञतेची जिवंत झलक आहे.

 

दिव्यांच्या उजेडात झळकलेली ही “स्वच्छतेची दिवाळी” खरंच सर्वांच्या मनात उजेड पसरवणारी ठरली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page