सोमाटणेत अथर्वशीर्ष पठण व महाआरती उत्साहात
सोमाटणे :
अधिक महिन्यातील संकट चतुर्थीचे औचित्य साधून सोमाटणे येथील बिर्ला गणपती मंदिरात नंदलाल गोशाळा, महादेव मंदिर, गणपती बाप्पा मोरया पुणे ग्रुपच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती उत्साहात संपन्न झाली.
तीन वर्षांनंतर आलेल्या अधिक महिन्यातील आणि बुधवारच्या दिवशी आलेल्या या संकट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. सकाळी १० वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. त्यानंतर श्री गणरायाची महाआरती व प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ. वैशाली मोकाशी, सुरेंद्र भाटिया, यांनी उपस्थित राहून महाआरतीत सहभाग घेतला. उपस्थित भाविकांनी गणपती बाप्पांच्या चरणी आरोग्य, सुख, समृद्धी व समाजकल्याणासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमास ग्रुपचे सभासद, गणेशभक्त व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.






