गौरव, शिक्षकांचा सन्मान; प्रगती विद्या मंदिरात प्रेरणादायी सत्कार सोहळा!
इंदोरी, प्रतिनिधी :
प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प. आ.ना. काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज, इंदोरी येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थी तसेच दहावी-बारावीच्या १५ गुणवंत शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा प्रेरणादायी कार्यक्रम शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमास साप्ताहिक अंबरचे सहसंपादक अतुल पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, पंचायत समिती गटनेते दिलीप ढोरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दशरथ (नाना) ढोरे, उपाध्यक्ष दत्तात्रय घोजगे, कोषाध्यक्ष सुनील दाभाडे, प्राचार्य महादेव ढाकणे, सल्लागार लक्ष्मण मखर, सुभाष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य महादेव ढाकणे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत माजी विद्यार्थी संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी रिद्धी संकपाळ, सानिका पवार, दुर्गश्वरी भोसले, गौरी सप्रे, राधा सलोनिया आणि दर्शना गावडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व ‘बोल तुकोबारायांचे’ हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
रिद्धी संकपाळ व गौरी सप्रे यांनी मनोगत व्यक्त करत शिक्षक आणि पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ अध्यापिका शारदा वाघमारे यांनीही सत्काराबद्दल भावना व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुणे प्रशांत ढोरे व दिलीप ढोरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अतुल पवार यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर गाव, पालक व शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. तसेच माजी विद्यार्थी संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगतात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दशरथ नाना ढोरे यांनी शाळेच्या मैदानावर भव्य शेड उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची देणगी जाहीर करत सर्व माजी विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा चव्हाण यांनी केले, तर सांस्कृतिक विकास प्रमुख लक्ष्मण मखर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास दगडे, अंकित वादळ, रुपेश शिंदे, दीपक डांगले, स्मिता गजभिव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






