विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लायन्स क्लबचा पुढाकार; शाळेला माईक सिस्टीम तर वृद्धाश्रमाला वॉशिंग मशीनची भेट!
तळेगाव दाभाडे :
लायन्स क्लब तळेगावच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवून आणण्यात आला. संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत आयोजित “सार्वजनिक संभाषण कौशल्य” कार्यशाळेच्या निमित्ताने लायन्स क्लब तळेगाव आणि संत ज्ञानेश्वर शाळेच्या संयुक्त विद्यमाने शाळेला उत्कृष्ट दर्जाची माईक सिस्टीम प्रदान करण्यात आली.
या देखण्या समारंभास शिक्षण सभापती सौ. भारती धोत्रे, शिक्षणाधिकारी अनिता वैद्य, मुख्याध्यापिका वसुंधरा माळवदकर तसेच प्रकल्प अधिकारी दीपक बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी संवाद कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ लेखक, वक्ते व लायन डॉ. शालिग्राम भंडारी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणातून विद्यार्थ्यांना वक्तृत्व कलेत आत्मविश्वास वाढविण्याचे प्रभावी तंत्र सांगितले.
त्यानंतर शनिवार, दि. २० जून रोजी मधुबन वृद्धाश्रम येथे सुमारे २५ हजार रुपये किमतीचे वॉशिंग मशीन भेट देण्याचा उपक्रम पार पडला. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक तुषार दळवी यांनी उपस्थितांना वृद्धांचा परिचय करून दिला.
लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी लायन्स आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्याची माहिती देत, देणगीदार आणि वृद्धाश्रमाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रकल्प अधिकारी लायन दीपक बाळसराफ यांनी वृद्धांना सकारात्मक दृष्टीकोनातून जीवन जगण्याचा संदेश दिला. तसेच लायन भरत पोतदार यांनीही उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाला आर्थिक सहाय्य करणारे डॉ. शालिग्राम भंडारी आणि डॉ. दीपाली झवर भंडारी यांनी संतवाणीतील “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी” या विचारांचा उल्लेख करत समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक तुषार दळवी यांनी आभार मानल्यानंतर उत्कृष्ट अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षण, संवादकौशल्य आणि समाजसेवेचा संदेश देणारे हे दोन्ही उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले






