तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी. चोरलेल्या दुचाकी सहित तिघे अटकेत,सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
नवलाख उंब्रे :तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी विनोद मेघावत (वय २४, रा. पाषाण, पुणे) यांची दुचाकी (क्र. MH-12-11-6711) १९ जुलै रोजी बदलवाडी येथील मार्क कॉट कंपनीसमोरून चोरीस गेली होती. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५४/२०२५ नोंदवण्यात आला होता. तपास पोउनि डि. आर. खरात करत होते.
गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ३० जुलै रोजी महाळुंगे (ता. खेड) येथे छापा टाकून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे सोहेल नवाज खान (वय २०, रा. द्वारका सिटी, महाळुंगे), संतोष अशोक अहिवळे (वय १९) व सुमीत संतोष शिंगारे (वय १९, दोघेही रा. राजू घाटे रूम, महाळुंगे) अशी आहेत. मूळ गावे अनुक्रमे गुलबर्गा (कर्नाटक), सोलापूर व लातूर जिल्ह्यातील आहेत.
अटक केलेल्या तिघांना १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, चौकशीत त्यांनी तळेगाव एमआयडीसी येथील दोन गुन्ह्यांमधून (गु.र.नं. १५४/२०२५ व १४९/२०२५) एकूण तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस आयुक्त विनायककुमार चोबे, उपआयुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि. विवेक गोवारकर, पो.ह. ए. डी. रावण, पो.ना. ज्ञानेश्वर सातकर, पो.कॉ. स्वराज साठे, रमेश घुले, विनायक शेरमाळे, भिमराव खिलारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अवघ्या काही दिवसांत तिन्ही दुचाकी हस्तगत करून पोलिसांनी शंभर टक्के मालमत्ता परत मिळवली असून, त्यांच्या या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.






