गॅस पाईपलाईनच्या खोदकामामुळे तळेगावात धोक्याची घंटा; काम तातडीने थांबवण्याची मागणी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :शहरातील लिंब फाटा ते मारुती मंदिर चौकदरम्यान सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत असून, हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी माजी नगरसेवक अरुण बबनराव माने यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.

 

सध्या शहराच्या मुख्य रस्त्यालगत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ज्या मार्गातून ही लाईन टाकली जात आहे, त्याच भागाखाली तळेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १२ इंची दोन जलवाहिन्या आधीपासून अस्तित्वात आहेत. याचबरोबर विद्युत पुरवठ्याच्या केबल्सही जवळून गेलेल्या आहेत. त्यामुळे खोदकामादरम्यान निर्माण होणारा धोका अधिक गडद झाला आहे.

 

अलीकडेच खोदकाम सुरू असताना पाणीपुरवठ्याची मुख्य लाईन फुटल्याने गावभागातील नागरिकांना तब्बल दोन दिवस पाण्याविना राहावे लागले. त्याचवेळी विद्युत केबल्सचेही नुकसान झाल्याने नागरिकांना अंधार आणि गैरसोयीचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Advertisement

 

अरुण माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, एकाच मार्गातून पाणी, वीज आणि गॅस अशा तिन्ही अत्यावश्यक सेवा नेल्यास भविष्यात मोठा अपघात घडू शकतो. उद्या पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी खोदकाम करताना गॅस लाईन बाधित होण्याची किंवा गॅस लाईन दुरुस्तीदरम्यान पाणीवाहिनी फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो.

 

यावर उपाय म्हणून गॅस पाईपलाईन विद्यमान जलवाहिन्यांपासून किमान दोन फूट अंतर राखून टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा हे काम तात्काळ थांबवावे.

 

दरम्यान, नागरिकांमध्येही या कामाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सोयीच्या नावाखाली सुरक्षिततेशी तडजोड नको, अशी भावना व्यक्त होत आहे. आता नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेणार, याकडे तळेगावकरांचे लक्ष लागले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page