येत्या १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक जाहीर
*पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून येत्या १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पहिले व दुसरे सत्र, तसेच दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या तारखाही स्पष्ट करण्यात आल्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी करून सर्व शाळांना वेळापत्रकानुसार नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत* .
जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, शाळांचे पहिले सत्र १५ जून २०२६ पासून सुरू होऊन ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान सुट्टी देण्यात येणार आहे.
दिवाळी सुट्टीनंतर शाळांचे दुसरे सत्र पुन्हा सुरू होईल. हे सत्र १ मे २०२७ पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. उन्हाळी सुट्टीचा कालावधी ३ मे ते १४ जून २०२७ असा निश्चित करण्यात आला आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया, पुस्तक वितरण आणि विविध शैक्षणिक तयारीला वेग आला आहे.






