पवना धरण ७२% भरले
पवनानगर :
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ परिसराला पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण सध्या तब्बल ७२% भरले असून, यंदाच्या पावसाळ्यात धरण परिसरात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठ्याबाबतची चिंता मिटलेले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सतत जोरदार पाऊस सुरू असून, गेल्या २४ तासांत ३३ मि.मी. इतकी नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण १०८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर येवा वाढत असून पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
धरणात वाढत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर, पुरपरिस्थिती टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, शनिवार, (दि. ५) रोजी दुपारी १२ वाजल्यापासून, सांडव्यातून ४०० क्युसेक्सने पाणी पवना नदी पात्रात सोडले आहे. हा विसर्ग नियंत्रित स्वरूपात असणार असून, तो दि. १५ जुलैपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार, विसर्गामध्ये कमी-अधिक बदल होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.
*नदीकाठच्या नागरिकांसाठी सूचना*
पवना नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कोणीही नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रातील मोटारपंप, शेतीची अवजारे, जनावरे व तत्सम साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे.अशा सूचना जलसंपदा विभागाच्या वतीने नागरिकांना देण्यात आलेले आहेत.