*बालविकास विद्यालयात आषाढी दिंडीचा जल्लोष*
तळेगाव दाभाडे –
स्नेहवर्धक मंडळ सोशल अॅण्ड एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला साजरा होणारा पहिलाच सण असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.
शुक्रवार, ४ जुलै रोजी, शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात पारंपरिक पद्धतीने आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदाय यांची ओळख व संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत शेटे, सचिव श्री. किशोर राजस, खजिनदार श्री. शिवाजीराव आगळे, मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे, कार्यालयीन अधीक्षिका सौ. सुजाता कुलकर्णी, प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ. वंदना भोळे व पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. अमृता देशमुख यांच्या उपस्थितीत पालखी पूजन व आरती पार पडली.
सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या साकारलेल्या रूपाभोवती रिंगण करण्यात आले. नंतर टाळ-मृदंगाच्या गजरात व “विठू नामाचा” जयघोष करत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवे झेंडे, वारकरी वेशातील बालगोपाळांच्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारावून गेला.
विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, सखुबाई, सोपानदेव, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताई, एकनाथ, गोरा कुंभार, भक्त पुंडलिक आदी संतांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात भाग घेतला. मोठ्या गटातील विद्यार्थी शिवम खराते याने श्री विठ्ठल तर विद्यार्थिनी जिजा दिघे हिने रुक्मिणीची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संस्थेचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व तसेच परंपरा विद्यार्थ्यांना सांगत पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकांचे तसेच सुंदर सादरीकरणासाठी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. स्नेहल बंगाळ यांनी केले. स्वागत भाषण सौ. अमृता देशमुख यांनी केले. सौ. अश्विनी आंबेटकर आणि सौ. तृप्ती बेद्रे यांनी विद्यार्थ्यांकडून अप्रतिम नृत्य सादर करून घेतले. पालखी व दिंडी सजावटीसाठी सौ. हर्षदा उंडाळे, सौ. प्रियांका बोरकर आणि सौ. जयश्री चौहान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटून करण्यात आली.