कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून पुणे, सातारा घाट, रत्नागिरी परिसरात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे
पुणे :राज्यात सध्या काही भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाट परिसरात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी ठराविक भाग वगळता इतर भागात मुसळधार पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे काही भागात तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. तर, कोकण, घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज रत्नागिरीबरोबरच पुणे आणि सातारा घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नांदेड, नागपूर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली , जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस आधीच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता
पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मोसमी वाऱ्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर, सोनीपत, आयोध्या, गया, पुरुलिया, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे केंद्र ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांपासून कमी दाब क्षेत्रापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मुंबईत हलक्या सरींचा अंदाज
मुंबईत आज हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मुसळधार पाऊस शक्यतो पडणार नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
खालील ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे
(ऑरेंज अलर्ट)
(१)रत्नागिरी, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर
(२) मुसळधार पावसाचा अंदाज सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट)
रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, नागपूर, भंडारा, नांदेड, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली
(३) वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज (येलो अलर्ट)
जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड,अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.
तरी वरील भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. कोणतेही समस्या उद्भवल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.