इंद्रायणी महाविद्यालयात जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद!
तळेगाव दाभाडे (दि.११): इंद्रायणी महाविद्यालयात मोंडेलीज इंटरनॅशनल, सेंटम वर्क स्कील यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य जॉब फेअरचे आयोजन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि सचिव चंद्रकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमात विविध नामांकित 15 ते 20 कंपन्यांनी सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या.
जॉब फेअरमध्ये सुमारे 300 ते 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा आढावा घेण्यासाठी कंपन्यांच्या एचआर अधिकाऱ्यांनी थेट मुलाखती घेतल्या. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांनुसार नोकऱ्यांसाठी संधी देण्यात आली आणि काही विद्यार्थ्यांना त्वरित रुजू होण्यासाठी निवड प्रमाणपत्र (ऑफर लेटर) देण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मलघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. रोजगार मिळवण्यासाठी योग्य कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.”
विद्यार्थ्यांनी या संधीचे स्वागत करत यासारख्या उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
हा जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले. आयोजकांकडून पुढील वर्षीही अधिक संख्येने कंपन्या आणि विद्यार्थी सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले.यावेळी वाणिज्य शाखा प्रमुख रुपकमल भोसले, फार्मसी शाखा प्रमुख डॉ. संजय अरोटे, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रो. श्याम आवटे मधुश्री फाऊंडेशनचे संचालक श्रीकांत कदम, माधवी कदम, लाईट हाऊस कम्युनिटीचे सुब्रत नायक, अल्पा पांडे आणि सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.