पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण विभागात खळबळ! सह प्रकल्प अधिकाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, RTE प्रवेश प्रक्रियेत अँटी करप्शन रेडचा परिणाम पदावरून हकालपट्टी केलेले विलास दयाराम पाटील यांच्यावर होते शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारासह RTE प्रवेश प्रक्रियेत घोटाळ्याबद्दल गंभीर आरोप
पिंपरी चिंचवड, :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागात मोठी प्रशासनिक कारवाई झाली असून सह प्रकल्प अधिकारी विलास दयाराम पाटील यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी केंद्राशी संबंधित प्रकरणामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, विलास पाटील यांची नियुक्ती RTE प्रवेश प्रक्रियेच्या कागदपत्र पडताळणी केंद्रावर सचिव म्हणून करण्यात आली होती. मात्र, या केंद्रावर अफरातफर झाली असून बाह्य व्यक्तीवर लाच लुजपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना उघड झाली. त्यामुळे जबाबदारीच्या पदावर असलेल्या श्री पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व प्रवेश प्रक्रियेच्या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या. तसेच सह प्रकल्प अधिक म्हणून त्यांची कारकिर्द खूप वादग्रस्त राहिली असून त्यांच्या विरोधात शिक्षण विभागाकडे तक्रारी देखील दखल आहेत. परिणामी महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचा मुद्दा प्रशासनाने गंभीरपणे घेतला. या पार्श्वभूमीवर विलास पाटील यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर शंका उपस्थित करत त्यांचा सह प्रकल्प अधिकारी पदाचा पदभार तात्काळ रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यांची उचलबांगडी करून शेवंताबाई खंडूजी जगताप वैदूवस्ती मुले-मुली शाळा क्र. ५८ येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या शाळेत तात्काळ शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित मुख्याध्यापकांनी त्यांना शालेय कामकाज सोपवून रुजू अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, विलास पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर आरोप व चर्चांना उधाण आले असून, शिक्षण विभागात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. काही कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कारकिर्दीबाबत संशय व भ्रष्टाचाराच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र, या सर्व बाबी अद्याप अधिकृत चौकशीच्या प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले असले तरी त्याची उचलबांगडी करून केलेले (Demotion) डिमोशन या कारवाईमुळे शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शिक्षण विभागातील या गंभीर प्रकरणाबाबत नियमानुसार प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग उप आयुक्त यांनी आदेशित करून कारवाई केली आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या बाबतीत वारंवार तक्रारी येत असताना देखील गेली दीड वर्षापासून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात होती. परंतु सतर्क पत्रकार व जागरूक नागरिक महावीर जाधव यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनावर दबाव वाढल्याचेही बोलले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षण विभागात एवढी मोठी कारवाई झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष लागले असून कारवाई झालेल्या श्री पाटील यांच्यावर खातेनिहाय चौकशी लागण्याची शक्यता असून त्यात ते थेट दोषी आढळल्यास कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई होऊ शकते. तसेच निष्पन्न झालेल्या घोटाळ्या संदर्भांत दांडासाहित रक्कम वसुली करून भविष्य निर्वाह निधीसह निवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील चौकशी आणि कारवाई काय होते हे जाणून घेण्यासाठी सर्वांचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे लागले असून शिक्षण क्षेत्रात अशा व्यक्तींमुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे अतोनात नुकसान होत आहे अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.






