तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा ३६६ कोटी ७४लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर पाणी पुरवठा, रस्ते ,पर्यावरण सुधारणा, शहरसौंदर्यीकरण,भुयारी गटार योजनांना प्राधान्य
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे २०२५-२६
या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रारंभिक शिलकेसह सादर करण्यात आले आहे.प्रशासकीय कारभारातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
प्रशासक तथा मावळचे प्रांत सुरेंद्र नवले व मुख्याधिकारी
विजयकुमार सरनाईक यांनी अंदाजपत्रक सादर केले. अंदाजपत्रकात पाणीपुरवठा, रस्ते,
स्वच्छता ,आरोग्य
नाट्यगृह,शहरसौंदर्यीकरण, माझी वसुंधरा, भुयारी गटार , शाळा बांधकाम व क्रीडांगण या योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे.मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत, यंदाचे अंदाजपत्रक एकूण खर्च ६९ कोटी ५ लाख ४५ हजार रुपयांची वाढ असलेले आहे. सन २०२४ – २५ मध्ये
नगरपरिषदेसाठी २९७ कोटी ६९ लाख २२ हजार ९२६
रुपये इतकी तरतूद करण्यात आली होती. यंदाच्या अंदाजपत्रकात
नगर परिषदेच्या महसूल वाढीसाठी मालमत्ता कर आणि इतर शासकीय शुल्कांत किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात नवीन रस्ते बांधकाम, रस्ते दुरुस्ती,
पर्जन्य जल वाहिन्या, नवीन
पोल उभारणे,भुयारी गटार योजना, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पणन महामंडळाच्या मदतीने गाव तलाव स्वच्छ करून ते प्रदूषणमुक्त करण्यासाठी तरतूद केली आहे. तलावातील जलप्रदूषण नियंत्रणासाठी बायोरेमिडेशन ,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विकेंद्रीत एसटीपीचा समावेश आहे. तळेगाव स्टेशन भागातील ऐतिहासिक तळ्यातील पाण्याचा उपसा करुन परिसरातील भागात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पाणी प्रक्रिया करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित केले आहे.याशिवाय
नगरपरिषदेची
नवीन प्रशासकीय इमारत, तसेच लिंबफाटा येथील प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि पाण्याचे कारंजे उभारणी, चौक सुशोभीकरण तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील नागरीकांसाठी आरोग्य सुविधा, खेळाडू प्रोत्साहन योजना, तसेच दिव्यांगांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. भाजी मंडईचे नूतनीकरण, बगीचे, उद्याने विकसित करणे यालाही अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) थेट नगरपरिषदेमार्फत स्वस्त आणि सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
शहरातील पर्यावरण सुधारणा हा यंदाच्या अंदाजपत्रकाचा महत्वाचा घटक आहे. तसेच, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. पर्यटनक्षेत्र विकास अनुदानातून ग्रामदैवत डोळसनाथ मंदिराच्या विकासासाठी विशेष अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे. _____________________
सुधारित सन २०२५-२६
अर्थसंकल्पीय तरतूद
टेबल-१
तपशील—- सुधारित तरतूद रु.
१. प्रारंभिक शिल्लक – ६६,३७,९१,५१७
२. महसुली जमा- ७६,६४,१५, ५००
३. भांडवली जमा- २२३, ७४, ५९, ०००
४. एकूण जमा- ३००, ३८, ७४, ५००
५. शिलकेसह एकूण जमा – ३६६, ७६, ६६, ०१७
——————-
टेबल-२
खर्चाचा तपशील- सुधारित तरतूद रु.
१. महसुली खर्च- ८५,०२,१३,०००
२. भांडवली खर्च- २८१,७२,५४,०००
३. एकूण खर्च-३६६, ७४, ६७, ०००
४. अखेरची शिल्लक-१,९९, ०१७
——————