आदिवासी मुख्य प्रवाहात येणे गरजेचे – रामदास काकडे
पुणे:-
आजचा आदिवासी हा मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे. तो आर्थिक सक्षम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आदिवासी साहित्यातून आलेले चित्रण हे पोरकेच ठरेल. आदिवासी साहित्यानेही आदिवासींच्या उन्नतीसाठी, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वप्रथम प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, इंद्रायणी महाविद्यालयाचा मराठी विभाग व आदिवासी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शतकातील आदिवासी साहित्य : स्वरूप आणि वाटचाल या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून काकडे बोलत होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, बीजभाषिक म्हणून डॉ. संजय लोहोकरे, उद्घाटक म्हणून कवी वाहरू सोनवणे, इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे कर्यावाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, आंतरविद्याशाखीय अधिष्ठाता डॉ.प्रभाकर देसाई व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे तसेच महाराष्ट्रभरातून व देशभरातून नामवंत समीक्षक कवी संशोधक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

याप्रसंगी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका तसेच चर्चासत्र आयोजित करण्यासाठी विद्यापीठाने व इंद्रायणी महाविद्यालयाने घेतलेला पुढाकार यासंदर्भात मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोमटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करताना त्यांनी आदिवासी साहित्याबद्दल सजगता आणि जागृती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
चर्चासत्राचे उद्घाटन ज्येष्ठ कवी व साहित्यिक वाहरू सोनवणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना सोनवणे म्हणाले की, मूल्यनिष्ठ समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहात येणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्घाटन सत्राचे बीजभाषक म्हणून डॉ. संजय लोहोकरे यांनी आपली व्यापक भूमिका स्पष्ट केली. व्यापक परिप्रेक्षातून आदिवासी साहित्याकडे बघायला हवे. साहित्याच्या प्रवाहांमध्ये आदिवासी साहित्य व आदिवासी इतर साहित्य या दोन साहित्य प्रवाहांचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत लोहकरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, आदिवासी समाजाची जीवन व्यवस्था ही मुळातच समताधिष्टित असून समतेच्या न्यायाने या समाजाकडे बघण्याची सर्वांची दृष्टी प्रगल्भ व्हायला हवी. असा आशावाद त्यांनी बोलताना व्यक्त केला. उद्घाटन सत्राचा समारोप डॉ. मलघे यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संदीप कांबळे व प्राध्यापक सत्यजित खांडगे यांनी केले.






