कन्या शाळा क्रमांक चार मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
तळेगाव दाभाडे :
दीर्घ सुट्ट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच १५ जून २०२६ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती अनिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र. ४ मध्ये शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेश द्वाराजवळच तळेगाव दाभाडे शहरातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बांदल, नवनाथ कुल,दिलीप चौधरी, गंगाराम भेगडे ,तानाजी काकडे ,अण्णा दाभाडे , तानाजी काळोखे व रवींद्र दाभाडे यांनी विद्यार्थिनींना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच चॉकलेट व बिस्किटे देऊन त्यांचे शाळेत पडणारे पहिले पाऊल गोड केले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थीनी व नव्याने दाखल झालेल्या इयत्ता पहिलीतील बालचमुंचे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका व शालेय शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती नगरपरिषद तळेगाव दाभाडे च्या सदस्या सौ सोनाली ताई दरेकर यांनी आवर्जून उपस्थित राहून सर्वांचे स्वागत व कौतुक केले. याप्रसंगी शैक्षणिक वर्षाची क्रमिक पाठ्यपुस्तके, शालेय दप्तर, लेखन साहित्य पाण्याची बाटली , पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती अनिता वैद्य मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता पहिलीच्या नव्याने दाखल झालेल्या मुलीशी संवाद साधला तसेच मुख्याध्यापक सौ अनिता तिकोने मॅडम यांच्याशी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाबाबत चर्चा देखील केली .प्रवेशोत्सवानंतर इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचा व पालकांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन छोटे छोटे मनोरंजनात्मक खेळण्यात आले तसेच “माझी ओळख” या सदराखाली त्यांच्या हाताचे ठसे उमटवण्यात आले. उपस्थित पालक व विद्यार्थी यांच्यासोबत “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम राबवून स्वतःच्या प्रगती सोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही वृक्षारोपण करून त्यांच्या मनामध्ये रुजवण्यात आला.त्याच सोबत उपस्थित मान्यवर व पत्रकार शैलाजाताई फुलकर यांच्या हस्ते “एक पेड स्कूल के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सिद्धी कम्युनिकेशनचे गिरीश चौरे व अक्षय घरदाळे यांच्यातर्फे 50 शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या माजी मुख्याध्यापिका सुरेखाताई जाधव यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक वैशाली साबळे, ताहेरा बासडे, सोनाली घाटे, प्राची लोमटे व गणेश ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निकिता शितोळे यांनी केले. अशा प्रकारे अतिशय उत्साहात व जल्लोषात सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्याशाळा क्र.४ मध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.






