*नवी आव्हाने शोधत विद्यार्थी दशेत गिरवावे उद्योजकतेचे धडे* – रामदास काकडे
तळेगाव दाभाडे:- आजचे नवे युग तंत्रज्ञानाधारित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स झपाट्याने जगाचा ताबा घेत असताना तीव्र होणाऱ्या स्पर्धेचे भान ठेवत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत उद्योजकतेचे धडे गिरवून नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनावे असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए, बीसीए विभागातील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला, त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काकडे बोलत होते. यावेळी बीबीए/ बीसीए विभागाच्या विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.संदीप भोसले, प्रा . के.डी. जाधव, गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांना सांगत रामदास काकडे म्हणाले की, विद्यार्थी म्हणून घडत असताना विद्यार्थ्यांनी वाचनाचे भान ठेवणे गरजेचे आहे. वाचनाने आपल्याला भवतालाचे ज्ञान होते. सतत नाविन्यतेचा ध्यास उराशी बाळगत संधी निर्माण करून संधीचे सोने करण्याची ताकद विद्यार्थ्यांनी ठेवावी व स्वतःला घडवावे असा वडीलकीचा सल्ला यावेळी काकडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे यांनी केले. यावेळी बोलताना प्रा. भेगडे यांनी बीबीए, बीसीए विभागाच्या यंदाच्या वर्षीपासून बदललेल्या स्वरूपाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले. संगणकाचे व्यावसायिक शिक्षण देणारी ही शाखा नुकतीच AICTE या शिखरसंस्थेच्या नियमावलीत नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणाचा (NEP 2020) विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्या भेगडे यांनी विभागाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा आढावा आपल्या भाषणात घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच खेळ आयोजित करण्यात आले होते.
इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विभागाची विद्यार्थिनी सिया रेगो हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. योगिता दहिभाते यांनी आभार प्रदर्शन केले.