वडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा समस्या बैठकीत भाजपा नगरसेवक यांचा आक्रमक पवित्रा; टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे आश्वासन
वडगाव मावळ : वडगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज वडगाव नगरपंचायत येथे पाणीपुरवठा समस्येबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर शांततामय मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील विविध प्रभागांमध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वडगाव नगरपंचायत पाणीपुरवठा समस्या बैठकीत नागरिकांच्या विविध मागण्या व सूचना मांडण्यात आल्या. उन्हाळ्याच्या कालावधीत अनेक भागांमध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक घरापर्यंत नियमित, पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात विरोधी पक्ष नेत्या नगरसेविका सौ. अर्चनाताई संतोष म्हाळसकर, नगरसेवक विशालजी वहिले आणि नगरसेविका सौ. सारिकाताई प्रशांत चव्हाण यांनी नागरिकांच्या वतीने प्रशासनास जाब विचारला. पाणीप्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
मोर्चादरम्यान नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रतीकात्मक टाळे ठोकून निषेध नोंदविला. बैठकीस नगराध्यक्षा गैरहजर राहिल्याने उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चांगलेच धारेवर धरत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकारी प्रवीण निकम व उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सुनील ढोरे यांनी परिस्थितीची दखल घेत ज्या भागांमध्ये पाणीटंचाई गंभीर आहे त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी नगरसेवक अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, नगरपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, अधिकारी तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. वडगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल,” अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी यावेळी मांडली.






