कामशेत पोलिसांचा पहाटेचा सर्जिकल सापळा; दरोड्याच्या तयारीतील दोन मुंबईकर तरुण जेरबंद
कामशेत : मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात पहाटेच्या शांततेला गुन्हेगारीचा काळा डाव लागण्यापूर्वीच कामशेत पोलिसांनी चपळाईचे दर्शन घडवत दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयितांना जेरबंद केले. या कारवाईत शस्त्रसामग्री, मोबाईल फोन, डिजिटल घड्याळे आणि इतर वस्तूंसह तब्बल ११ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या दक्षतेमुळे संभाव्य मोठा गुन्हा उधळून लावण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र रामचंद्र राऊळ यांनी फिर्याद दिली असून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकनाथ कृष्णा रोकडे (वय २८) आणि संकेत बाबू माने (वय ३२, दोघेही रा. मानखुर्द, मुंबई) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जून रोजी सकाळी साडेसहाच्या सुममारास कामशेत गाव हद्दीतील सहारा कॉलनीलगतच्या मोकळ्या मैदानात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती गस्तीवरील पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचत दोघांवर नजर ठेवली. संशय अधिक बळावल्याने त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.
आरोपींकडून मिरचीपूड, धारदार चाकू, कटर, लोखंडी रॉड, दोरखंड तसेच विनापरवाना लोखंडी कोयता असा दरोड्यासाठी वापरला जाऊ शकणारा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी वापरत असलेल्या स्कुटरच्या क्रमांकफलकावर ओळख लपविण्याच्या उद्देशाने कापड बांधण्यात आले होते. त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, डिजिटल घड्याळे आणि इतर साहित्याबाबतही ते समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत.
प्राथमिक तपासात हे दोघे त्यांच्या आणखी तीन फरार साथीदारांसह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, पोलीस हवालदार सुहास सातपुते आणि पोलीस शिपाई रविंद्र राऊळ यांनी सरकारी वाहनातून पाठलाग करून दाखविलेल्या धाडसी आणि सतर्क कारवाईमुळे संभाव्य गुन्हेगारी कटाचा पर्दाफाश झाला. या कारवाईमुळे कामशेत परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असून पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.






