*मराठी पत्रकार परिषदेच्या 86 व्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन*
पिंपरी चिंचवड :
राज्यातील समस्त मराठी पत्रकारांच्या स्वाभिमान आणि न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या ८६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देश पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार दि. ३ डिसेंबर रोजी पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका पत्रकार संघांच्या पुढाकाराने प्रत्येक तालुक्यात तर *पिंपरी-चिंचवड मधे बुधवार दि 4 डिसेंबर 24 रोजी थेरगाव येथील हाॅस्पीटल येथे* पत्रकार व कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी दिली आहे.
३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. मराठी पत्रकार परिषदेचा हा स्थापना दिवस राज्यात गेली दहा वर्षे “पत्रकार आरोग्य दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्थानिक डॉक्टर्सच्या मदतीने पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. गंभीर आजाराचा रूग्ण सापडल्यास त्यास मुंबईस पाठवून त्याच्यावर उपचार केले जातात. . स्थानिक पत्रकारांनी पुढाकार घेऊन हे शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केलं आहे.
पत्रकारांचं आयुष्य दगदगीचं असतं. जागरण, अवेळी जेवण, तणाव या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. मात्र हे दुखणे अनेकदा अंगावर काढले जाते. विषय हाताबाहेर जातो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अशी वेळ कोणत्याच पत्रकारावर येऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठीच ही शिबिरं होत आहेत. स्थानिक पातळीवर सर्व पत्रकारांनी एकत्र येत शिबिरं यशस्वी करावीत असं आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, जिल्हा संघटक अनिल वडघुले यांनी केले आहे.