अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेतर्फे येत्या रविवारी साहित्यिक व कलाकार मेळाव्याचे आयोजन
तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी :
मावळ तालुक्यातील साहित्यिक व कलाकारांना एकत्र करून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन शासनाच्या विविध योजना कलाकारांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेच्यावतीने मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा येत्या रविवारी (दि.१२) सकाळी १० वाजता रिक्रिएशन हॉल, तळेगाव जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे (स्टेशन) या ठिकाणी होणार असून, याचे उद्घाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रांतिक अध्यक्ष बाबा पाटीलपुणे जिल्हा साहित्य वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकड़े आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला मावळ तालुक्यातील साहित्यिक, सिनेमा, नाट्य, नृत्य, वादन, गायन, भारुड, भजन, निवेदन, विविध लोककला अशा सर्व कला क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे आणि ज्येष्ठ पत्रकार पं. सुरेश साखवळकर यांनी केले आहे.