कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे वार्षिक सांस्कृतिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे येथे वार्षिक सांस्कृतिक महोत्सव अश्वमेध २०२६ अत्यंत उत्साहाच्या व आनंदमयी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हर्षदीप जोशी, कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते.
व्यासपीठावर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे तसेच यशोदा महादेव कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील व गोरख काकडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. एस.आर. आरोटे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी वार्षिक अहवाल सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीचे त्यांनी थोडक्यात विवेचन केले.
विद्यार्थी प्रतिनिधि कु. प्रतीक भाईक याने आपल्या ओजस्वी भाषणातून विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
प्रमुख अतिथी डॉ. हर्षदीप जोशी यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. भविष्यातील आव्हाने, फार्मास्युटिकल क्षेत्रातील संधी आणि सामाजिक जबाबदारी याबाबत त्यांनी सखोल विचार मांडले. तंत्रशास्त्र व औषधनिर्माण शास्त्रातील नवीन क्षितिजे धुंडाळण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांचे भाषण विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. अश्विनी जोशी आणि प्रा. श्वेता मंत्री यांच्या कुशल नेतृत्वाखाली सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे मन मोहून घेतले. समूह नृत्य, एकल नृत्य आणि गायनाच्या मनमोहक सादरीकरणाने सभागृह उत्साहाने दुमदुमले. विद्यार्थ्यांनी आपल्या अदाकारीने व सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे आभार डॉ. जी. एस. शिंदे, विभागप्रमुख, यांनी मानले.या कार्यक्रमास इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष संजय साने, उपाध्यक्ष शैलेश शाह, खजिनदार निरुपा कानिटकर व सर्व संस्थेचे विश्वस्त यांनी शुभेच्या दिल्या.स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






