मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग दहापदरी होणार; सतराहजार कोटींपेक्षा अधिक खर्चाची शक्यता
मावळ :
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता आणखी रुंद आणि सुलभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या द्रुतगती मार्गाचे आठ ऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग आहे. या मार्गावर दररोज सुमारे ६५ हजारांहून अधिक वाहने धावत असतात. वाढत्या वाहतुकीमुळे हा महामार्ग अपुरा पडत असून वारंवार वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमएसआरडीसीने पूर्वी या मार्गाचे सहापदरीकरण करून आठ पदरी महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या कामासाठी अंदाजे ६ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित होता.
परंतु, महामार्गाचे वाढते महत्त्व आणि वाहनसंख्येतील सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता, महामंडळाने काही महिन्यांपूर्वीच या मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून जून महिन्यात राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार होता. थोडासा विलंब झाल्याने आता तो प्रस्ताव लवकरच सरकारकडे पाठविण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
दहा पदरीकरणामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार असून, प्रवासाचा कालावधीही मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, वाहतूककोंडी, अपघात आणि विलंब यामध्ये घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, नव्याने जमिनीचे अधिग्रहण, अतिरिक्त पूल आणि उड्डाणपूल बांधकामे, तसेच आधुनिक सुरक्षा उपाययोजना यांमुळे एकूण खर्च आता १७ हजार कोटी रुपयांहून अधिक जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक मार्गिका वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन प्रवाह अधिक सुकर होईल. तसेच, काही ठिकाणी विद्यमान रचना सुधारून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला आणि सर्वाधिक वापरला जाणारा एक्सप्रेसवे आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींमध्ये या महामार्गाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे हा महामार्ग आणखी सक्षम आणि वेगवान करण्याच्या दिशेने सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लवकरच दहा पदरीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने काम सुरू केले जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवास केवळ जलद नव्हे, तर अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






