तळेगावातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी उत्सवात भक्तिमय वातावरण
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त भक्तिभावाने नटलेले धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल”च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला.
पहाटे श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेची काकड आरती, हरिपाठ आणि भजन यांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. भाविकांच्या गर्दीत पांडुरंगाच्या मूर्तीसमोर अखंड नामस्मरणाचा ध्वनी घुमत होता. पहाटेचा अभिषेक महापूजा कु. सिद्धी पराग गायकवाड व नित्योपचार समितीचे सचिव विलास गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या वेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आणि प्रत्येकाच्या मुखी फक्त “पांडुरंग”चे नाव होते.
दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दुपारच्या सुमारास हरिपाठ व सामुदायिक भजन सत्राने वातावरण अधिक पवित्र केले. भक्तजनांनी एकसुरात हरिनामाचा गजर करत विठ्ठल-रुख्मिणीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. मंदिरातील पुजारी वर्ग, सेवक व स्थानिक कार्यकर्त्यांनी या सर्व कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन केले.
सायंकाळी ह. भ. प. नथुराम महाराज जगताप पाटील यांचे प्रेरणादायी प्रवचन पार पडले. त्यांनी विठ्ठल भक्तीचे महत्त्व, नामस्मरणाची साधना आणि एकादशीचे अध्यात्मिक मूल्य यावर मनोवेधक भाष्य केले. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविकांना अंतर्मुख केले. रात्री ह. भ. प. मनोहर महाराज आळंदीकर यांच्या कीर्तन सेवेतून संपूर्ण वातावरण हरिनामाने भारावून गेले. त्यांच्या ओव्या, अभंग आणि संतवाङ्मयातील विचारांनी भाविकांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली.
कीर्तनानंतर महाआरती उत्साहात पार पडली. आरतीच्या तेजोमय ज्योतींनी मंदिर उजळून निघाले आणि त्यानंतर पांडुरंगाच्या चरणी अखंड “जागर” आयोजित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत हरिनामाचा गजर सुरू राहिला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे विश्वस्त हरिभक्त परायण बाळकृष्ण आरडे महाराज, यतीन शहा, प्रभाकर सरोदे, निवृत्ती महाराज फाकटकर, दिनेश दरेकर, शिवाजी सुतार.शाम बाळासाहेब भेगडे.प्रंशात शामराव दाभाडे.आणि पुरोहित अतुल काका देशपांडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अखेरीस महाआरती व प्रसाद वितरण गायकवाड परिवाराच्या वतीने करण्यात आले.
भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे तळेगावातील श्री विठ्ठल मंदिर परिसर पांडुरंग भक्तीने ओतप्रोत भरून गेला. कार्तिकी एकादशीचा हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरला.






