कामशेतमध्ये सुरू होणार ‘मोफत वैकुंठ रथसेवा नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण#
कामशेत: कामशेत शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मानवी संवेदनांनी ओथंबलेली सेवा सुरू होणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्या सहकार्यातून कामशेत शहरासाठी मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरू होत आहे. या उपक्रमामुळे शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना अंत्यविधीच्या प्रसंगी मोठा दिलासा मिळणार आहे.
कामशेत शहराची लोकसंख्या अलीकडच्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. नायगाव, चिखलसे, कुसगाव .पर्यंत शहराचा विस्तार झाला असून नवीन कॉलनी आणि सोसायट्यांमुळे लोकसंख्या आता दहा हजारांच्या पुढे गेली आहे. शहराचा विस्तार वाढत असताना, नागरिकांच्या गरजाही वाढत आहेत. विशेषतः अंत्यविधीच्या वेळी मृतदेह वाहतुकीसाठी योग्य वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता.
कामशेत स्मशानभूमी घाटावर आहे आणि नाणे पूल व आसपासच्या गावांतील नागरिकांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी दूर नेण्याची वेळ अनेकदा यायची. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर व्हायची. अशा वेळी मृतदेह खांद्यावर वाहून नेण्यासारखे प्रसंग घडत असत, ज्यामुळे नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असे.
या पार्श्वभूमीवर, सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी उभारून मोफत वैकुंठ रथ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिक या सेवेमुळे दिलासा अनुभवतील अशी अपेक्षा आहे.
या सेवेअंतर्गत शहरातील कोणत्याही नागरिकाला मृतदेह वाहतुकीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. प्रतिष्ठानकडून रथ उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक चालक व सहाय्यक यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
अनेक वेळा शहराबाहेरील नातेवाईक, परिचित लोक अंत्यविधीच्या वेळी कामशेतमध्ये येतात; पण अशा प्रसंगी वाहतुकीची सोय नसल्याने त्यांना अडचण निर्माण होत असे. या सेवेने अशा समस्येवर कायमचा उपाय मिळेल, असे नागरिकांचे मत आहे.
सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सांगतात की, “मानवी भावनांना केंद्रस्थानी ठेवून ही सेवा सुरू केली आहे. समाजाच्या योगदानातून उभारलेला हा उपक्रम केवळ कामशेतपुरता मर्यादित न राहता, परिसरातील गावांसाठीही उपयुक्त ठरेल. कामशेतसारख्या वाढत्या शहरात अशी मानवतावादी सेवा उपलब्ध होणे ही काळाची गरज होती, असे स्थानिक नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.
या उपक्रमासाठी खर्च केलेला निधी हा पूर्णपणे लोकवर्गणीद्वारे जमा करण्यात येत असून, प्रतिष्ठानतर्फे ही सेवा सतत, विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली राहील, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
कामशेतकरांना अंत्यविधीच्या वेळी सन्मानपूर्वक आणि सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देणारी ही ‘मोफत वैकुंठ रथ सेवा’ समाजातील एक नवीन आदर्श ठरणार आहे.






