सीईटी परीक्षार्थींच्या पालकांसाठी नूतन महाविद्यालयाची आपुलकी विद्यार्थ्यांसह पालकांच्याही सोयीचा विचार; मोफत मार्गदर्शन अन् अल्पोपहार
तळेगाव दाभाडे :
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही ताण वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित नूतन महाविद्यालयाने सीईटी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी राबविलेल्या उपक्रमात आपुलकी आहे.
मागील महिनाभरापासून महाविद्यालयात सुरू असलेल्या सीईटी परीक्षेदरम्यान विद्यार्थी परीक्षा केंद्रात असताना पालकांना बाहेर उन्हात तासन्तास थांबावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयाने पालकांसाठी वातानुकूलित सभागृहात बसण्याची व्यवस्था केली. तसेच अल्पोपहाराची सोय करून त्यांना प्रवेश प्रक्रिया, भविष्यातील शैक्षणिक संधी आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनही करण्यात येते.
दररोज दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शन उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक पालकांनी महाविद्यालयाच्या संवेदनशील आणि आपुलकीच्या भूमिकेचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी प्रा. अमोल बडे, प्रा. बलदेव मचवे तसेच वर्कशॉप विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनीही पालकांना मार्गदर्शन करण्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.
परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी प्रशांत सुतार, रोहित भेगडे व सहकाऱ्यांनी समर्थपणे सांभाळली.
उपक्रमाचे नियोजन डॉ. मिलिंद ओव्हाळ, डॉ. शेखर राहणे आणि डॉ. शंकरराव उगले यांनी केले. तर महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष संजय ( बाळा भेगडे ) उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, सहसचिव विनायक अभ्यंकर , खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, आदी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.






