राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी
मुंबई :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत अखेर राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (दि. ४) पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या, मात्र आता खऱ्या अर्थाने निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन अर्ज भरण्याची सुरुवात: १० नोव्हेंबर
नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर
नामनिर्देशन छाननी: १८ नोव्हेंबर
अपील नसल्यास माघारीचा दिवस: २१ नोव्हेंबर
अपील असल्यास माघारीचा दिवस: २५ नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी जाहीर: २६ नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान दिनांक: २ डिसेंबर
मतमोजणी व निकाल जाहीर दिनांक: ३ डिसेंबर
निकाल राजपत्रात प्रसिद्ध होणार: १० डिसेंबर
राज्यात पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींची निवडणूक
निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपरिषद (त्यापैकी १० नव्याने स्थापन) आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
२४६ नगरपरिषदांपैकी २३६ नगरपरिषदांची मुदत संपलेली असून आता त्यांचे प्रतिनिधी निवडण्यासाठी जनतेला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
राज्यातील १४७ नगरपंचायतींपैकी ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका या टप्प्यात होणार असून, त्यात १५ नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींचा समावेश आहे. २७ नगरपंचायतींची मुदत संपल्याने त्या यादीत समाविष्ट आहेत. तर १०५ नगरपंचायतींची मुदत संपलेली नसल्याने त्यांच्या निवडणुका सध्या होणार नाहीत.
राजकीय वातावरण तापणार
या निवडणूक घोषणेमुळे राज्यातील राजकीय पक्षांत पुन्हा एकदा चैतन्य संचारले आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे. स्थानिक प्रश्नांवर आणि विकासाच्या मुद्यांवर आधारित प्रचाराला आता सुरुवात होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया आता मार्गी लागली असून, २ डिसेंबर रोजी मतदारांचा उत्सव साजरा होणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल ३ डिसेंबरला लागल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण नव्या समीकरणांच्या दिशेने वळणार आहे.






