जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक#
पुणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२५ पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पुणे ग्रामीण पोलिस उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डुडी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सर्व तडीपार प्रकरणांचा गुणवत्तेवर निपटारा करणे, दारूबंदी आदेश काटेकोरपणे अंमलात आणणे, तसेच यापूर्वीच्या निवडणुकांतील गुन्ह्यांचा पाठपुरावा करण्याचेही स्पष्ट आदेश देण्यात आले.
पोलिस प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, तसेच ईव्हीएम साठवणुकीची सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचेही निर्देश दिले गेले.
याशिवाय, ईव्हीएम हाताळणी, सॉफ्टवेअरमधील माहिती भरणे, मतदार याद्या अद्ययावत ठेवणे, मतदार जागृती अभियान राबवणे, आणि मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचित केले की, निवडणुकीसंबंधित सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे काटेकोरपणे पार पाडाव्यात, आणि कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रत्येक स्तरावर समन्वय राखावा.






