घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) सकाळी ९ वाजता घोरावाडी रेल्वे स्थानकावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आश्वासनानंतर हे उपोषण दुपारी दोन वाजता मागे घेण्यात आले. रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक संजीव सोना यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. पुणे विभागाचे डीआरएम राजीव वर्मा यांच्याशी बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पोपटराव भेगडे व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणास सुरुवात झाली. उपाध्यक्ष दीपाली गोकर्ण, मोहन डंबे, सचिव विष्णुपंत गजरे, कार्याध्यक्ष सचिन जोशी, निरंजन फलके, पांडुरंग भेगडे, प्रसाद पानसे, महादेव धामणकर, नवनाथ कुल, दिलीप चौधरी, गडसिंग गुरुजी, विजय पंडित,अरविंद मुरकुटे,प्रवीण दातार,संजय इरकल, दिलीप डोळस यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement

नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुदाम शेळके, नगरसेवक शिवाजी आगळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला. राष्ट्रीय संघर्ष समिती, नवी दिल्ली मावळ तालुक्याच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दशरथ ढोरे, विजय राऊत, हरिचंद्र सावंत, राजू निम्हण, भरत मराठे, आदी उपस्थित होते.

दरम्यान, रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक संजय सोना यांनी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पुणे विभागाचे डीआरएम राजू वर्मा यांच्यासमवेत येत्या ३० एप्रिल रोजी पुणे येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर दुपारी दोन वाजता प्रवासी संघटनेचे अध्यक्ष पोपटराव भेगडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या संमतीने उपोषण मागे घेतले.

रेल्वे संघाच्या प्रमुख मागण्या

१) दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उपनगरीय लोकल गाडी सोडण्यात यावी.

२) रात्री ११:१५ ची शिवाजीनगर ते तळेगाव लोकल पूर्ववत सुरू करावी.

३) सह्याद्री एक्स्प्रेसची मुंबईपर्यंतची सेवा पुन्हा सुरू करावी.

४) बारामती-कर्जत पॅसेंजर पूर्ववत सुरू करावी.

५) महत्त्वाच्या गाड्यांना (सिंहगड, इंद्रायणी) तळेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा. घोरावडी रेल्वे स्थानकाची सुधारणा व्हावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page