तळेगावातील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक डीपी रोडची रुंदी कमी ठेवण्याची मागणी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील मारुती मंदिर चौक ते गणपती मंदिर चौक हा डीपी रस्ता १८ मीटर ऐवजी १२ मीटर करावा तसेच या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर करावे अशी आग्रही मागणी माजी उपनगराध्यक्ष किशोर छबुराव भेगडे व माजी नगरसेवक. माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण बबनराव माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा घाट घातला आहे. नगरपरिषदेने हा रस्ता १८ मीटर रुंदी करण्यासाठी या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबियांची घरे पाडावी लागतील अशी कुटुंबे बाधित होऊ नये म्हणून सध्याच्या रस्त्याची रुंदी वाढविण्या ऐवजी १२ मीटर रुंदी करून रस्ता करावा. तसेच हे रुंदीकरण पावसाळा संपल्यानंतर करावे अशी मागणी हि करण्यात आली आहे. मारुती मंदिर चौकातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्य इमारतीपासून छत्रपती संभाजीनगर मार्गे साईनाथ कॉलनी ते डाळ आळी गणपती मंदिर पर्यंत १८ मीटर रस्ता रुंदीकरणाचे नियोजन करून नगरपरिषदेने या रस्त्यालगत असलेल्या ६९ कुटुंबीयांना नोटिसा दिल्या होत्या. या नोटीसा ६९ कुटुंबियांना मिळाल्यानंतर या रस्त्यावरील कुटुंबीयांची घबराट झाली होती.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने येथील सर्व नागरिक हवालदिल झाले होते. त्या सर्व ६९ कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व माजी नगरसेवक अरुण माने यांची भेट घेऊन सदरील कारवाई थांबवावी अशी मागणी केली.