श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर साकारतेय नागर शैलीतील भव्य मंदिर : अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ
मावळ :
जगदगुरू संत तुकाराम महाराजांची चिंतन भूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या आकाशाएवढ्या कार्याला साजेसे भव्य-दिव्य मंदिर उभे राहत असून, सकल वारकरी सांप्रदाय व तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या भाविकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद व पदाधिकारी स्वतः लक्ष घालीत आहेत.
गांधीनगर, गुजरात येथील जगप्रसिद्ध अशा अक्षरधाम मंदिराच्या आधारावर संत तुकाराम महाराजांचे हे भव्य-दिव्य मंदिर होत आहे. मंदिराची लांबी १७९ फुट, उंची ८७ फुट व रुंदी १९३ फुट असून, मंदिराला तीन भव्य कळस असणार आहेत. मंदिराचा घुमट ३४ फुट बाय ३४ फुट असून १३.५ बाय १३.५ फुट आकाराची एकूण ५ गर्भगृहे मंदिरात असणार आहेत.
मंदिराच्या मध्यभागी मुख्य जागेवर श्री विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती व या मूर्तीकडे पाहत भक्तीमध्ये दंग झालेली श्री संत तुकाराम महाराजांची मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात येणार आहे. मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून, त्यावर ९०० वैष्णवांच्या मूर्ती असणार आहेत. मंदिराचे बाहेरील खांब हे चौरसाकृती व आतील खांब हे अष्टकोनाकृती असून, त्यावर ९०० वैष्णवांच्या मूर्तींचे सुंदर असे कोरीव काम असणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संपूर्ण हिंदुस्तानामध्ये रयतेचे राज्य ही लोकशाही पूरक संकल्पना ज्यांनी प्रत्यक्षात प्रथम अमलात आणली ते हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे धारकरी व वारकरी यांच्यासह भव्य दिव्य शिल्प साकारले जाणार आहे.
भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे, याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी, तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत आहेत.
या मंदिरासाठी स्थापत्यविशारद म्हणून आयोध्येतील श्रीराम मंदिराचे स्थापत्यविशारद चंद्रकांत सोमपूरा, निखील सोमपुरा व बापू मनशंकर सोमपुरा बंधू कार्यरत आहेत. तसेच मंदिराच्या निर्मितीची जबाबदारी रमेशचंद्र सोमपुरा आणि परेशभाई सोमपुरा या पिता पुत्रांनी घेतली आहे.