मावळची लेक राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धेत झळकणार; कु. सिया शिंदेची महाराष्ट्र संघात दमदार निवड!

SHARE NOW

कामशेत : मावळ तालुक्यातील कामशेत येथील कु. सिया युवराज शिंदे हिने आपल्या जिद्द, कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे. देहरादून येथे होणाऱ्या राष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाल्याने कामशेत परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिया ही तळेगाव दाभाडे येथील कांतिलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेत असून लहानपणापासूनच तिला क्रीडा क्षेत्राची विशेष आवड आहे. अभ्यासातही ती अत्यंत हुशार असून शाळेत नेहमी प्रथम क्रमांक पटकावत असते. “खेळ आणि शिक्षण यांचा समतोल साधत मोठे यश मिळवता येते,” हे तिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

Advertisement

राष्ट्रीय स्तर गाठण्यासाठी सिया दररोज पहाटे पाच वाजता उठून पुणे येथे सरावासाठी जात होती. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले. तिच्या या यशामागे शाळेतील शिक्षिका रोहिणी बनसोडे मॅडम यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले. तसेच आई सौ. सीमा युवराज शिंदे आणि वडील युवराज शंकर शिंदे यांनी तिच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीर पाठिंबा दिला.

ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तर गाठू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सिया शिंदे होय. आता आगामी राष्ट्रीय स्पर्धेत सियाने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मावळवासीयांनी व्यक्त केली आहे.

कु. सिया शिंदे हिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🌟🏅


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page