अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय पारंपरिक संस्कृतीचे दर्शन
पिंपरी :
अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात साजरे झाले. ‘राष्ट्रीय एकात्मता’ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनात विविध रंगाची वेशभूषा करीत विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते प्रशालेचे संस्थापक माजी महापौर कै. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे आणि संचालिका स्व. अनिता नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून गणेश वंदनेने करण्यात आली. यावेळी अध्यक्षा आरती राव, संस्थेचे सचिव प्रणव राव, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या उपमुख्याध्यापिका प्रीती पाटील, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षकवृंद, पालक आदी उपस्थित होते.
‘राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनात विविध रंगाची वेशभूषा करीत विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले. यामध्ये काश्मीरी, ओडिसी, राजस्थानी, बंगाली, गोवा, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात आदी राज्यातील विविधतेतून एकता विविध गाण्यांवर नृत्य करीत साकारली. याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती दाखविणारी शेतकरी नृत्य, गोंधळ, लावणीने उत्स्फूर्त दाद मिळवली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. देस रंगिला रंगिलावर नृत्य सादर करीत कार्यक्रमाची सांगता झाली. विविधतेतून ऐकतेमध्ये देशातील विविध रुढी, चालीरीती दाखवण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी, तर संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी आभार मानले. समीक्षा आढे, सायली सतराज, श्रावणी देशमुख, श्रेया गुडुळेकर, चिन्मय पुरोहित, सोहम बनसुडे, आर्या दंडारे, स्नेहा धाडवे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांचे नृत्य बसविण्यासाठी स्मिता बर्गे, नीलम मेमाणे, अमोल अडागळे, किशोर दळवी, दीपा हरेल यांनी; निवेदन स्वाती तोडकर, प्रीती पाटील, ज्योती फर्तीयाल, सुमित्रा कुंभार यांनी; फिल्म सुनीता ठाकूर, शिल्पा पालकर यांनी; नेपथ्य दर्शना बारी, देबजानी मुजुमदार, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक यांनी परिश्रम घेतले.