तळेगावात रंगली युवा कलाकारांची शास्त्रीय संगीताची मैफिल ‘रागरंग’…….

तळेगाव दाभाडे :

मावळ परिसरात संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या श्रीरंग कलानिकेतनची गंधर्व सभा आणि संगीत क्षेत्रात नव्यानेच कार्यरत झालेली विकेंड युफनी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ परिसरातील संगीत प्रेमी रसिकांसाठी रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी सरगम भारद्वाज व सावनी पारेकर या युवा गायिकांची  शास्त्रीय संगीताची मैफिल कांतिलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती.

तळेगावातील संगीत अभ्यासक व गुरु सौ.संपदा थिटे, श्रीरंग कलानिकेतनचे विश्वस्त विश्वास देशपांडे, ज्येष्ठ तबला वादक व ‘श्रीरंग’चे सचिव विनय कशेळकर, डॉ.राजेंद्र कुलकर्णी, विकेंड युफनीचे संचालक नितेश कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संगीत मैफिलीची सुरुवात झाली.

मैफिलीच्या पहिल्या भागात सावनी पारेकर या युवा गायिकेने आपल्या सुमधूर स्वरात पुरिया रागातील विलंबित तिलवाडा तालातील ‘मालनीया गुंद लावो लावो हरवा….,ही बंदीश व मध्यलय तिंतालातील ‘कैसे के मनाऊ अपने पियाको’…ही आपले दादा गुरु पं. यशवंत महाले यांनी रचलेली बंदीश सादर करून रसिकांची पसंती मिळवली आणि त्या नंतर नायकी कानडा रागातील बनरा मोरा प्यारा (विलंबित तिलवाडा) आणि मध्यलय तितालातील ‘बैया मुरक गयी….’ या पारंपरिक बंदीशी सादर करून मैफिलीची रंगत वाढवली.

Advertisement

मैफिलीच्या दुसऱ्या भागात तळेगांवातील सरगम चन्ना-भारद्वाज या युवा गायिकेने आपल्या बहारदार आवाजात मधुवंती रागातील मध्यलय रुपक तालातील ‘नैया पार करो’ व ‘काहे मान करो’ ह्या बंदिशी  आणि भैरवी रागातील ‘पवन पुरवाई’ ही बंदीश तसेच एक तराणा सादर करून मैफिलीची सुरेख सांगता केली.

या सुंदर मैफिलीला साजेशी सुंदर सुरेल साथ चेतन ताम्हणकर (तबला) व प्रिया करंदीकर-घारपुरे (संवादिनी) यांनी करून मैफिलीची रंगत वाढवली.

या मैफिलीला प्रख्यात गायक पं.विनोद भूषण आल्पे, संगीत संयोजक विश्वास पाटणकर व सुप्रसिद्ध तबलावादक सुनील देशपांडे या मान्यवरांची उपस्थिती होती.

मैफिलीचे सूत्रसंचालन सौ रश्मी कुलकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक नितेश कुलकर्णी यांनी केले.

उत्तम ध्वनी संयोजन ‘रसिक साऊंड’च्या केदार अभ्यंकर यांचे होते, छायाचित्रण श्रीकांत चेपे यांनी केले

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक आपटे, श्रावणी कुलकर्णी, यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page