वाढीव टप्पा अनुदानाचा १७३९ शिक्षकांना लाभ : २० टक्के वाढीव पगार जमा
शिरगाव :
पुणे जिल्ह्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील तसेच तुकड्यांवरील शिक्षकांच्या खात्यावर वाढीव २० टक्के टप्पा अनुदानाचा पगार नुकताच जमा झाला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे १७३९ शिक्षकांना थेट आर्थिक दिलासा मिळाला असून, दीर्घकाळ चाललेल्या लढ्याला अखेर यश मिळाले.
राज्यात सर्वप्रथम हा वाढीव पगार जमा करण्याचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला आहे. माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल शिक्षक बांधवांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले. वाढीव अनुदान मिळणे करिता शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदानावर अनेक वेळा आंदोलन करण्यात आले होते. शासनाने २५ ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाढीव २० टक्के अनुदान लागू केले. तत्परतेने शासन निर्णयाची अंमलबजावणी करत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी कार्यतत्परतेने फाईल तपासत प्रश्न मार्गी लावला. याकामी वेतन पथक अधीक्षक संजय गंभीरे दत्ता कठाळे, लिपिक नितीन आल्हाट, ………यांनी मोलाची भूमिका बजावली.
पुणे जिल्ह्यातील एकूण ९१ अंशतः अनुदानित शाळांतील ७३४ शिक्षक, ७० तुकड्यांतील ३०९ शिक्षक आणि ८३ अंशतः अनुदानित ज्युनिअर कॉलेजमधील ६९६ शिक्षक अशा एकूण १७३९ शिक्षकांच्या खात्यावर वाढीव टप्पा अनुदान जमा करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी आल्याचा आनंद सर्वत्र व्यक्त होत आहे. घरखर्चाचा ताळमेळ राखताना आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक शिक्षकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने वेळेत पगार जमा करून दिल्याने शिक्षकांनी शिक्षण विभागाचे मनःपूर्वक आभार मानले.
राज्यात सर्वप्रथम वाढीव टप्प्याचा पगार पुणे जिल्ह्यात देण्यात आल्याबद्दल अंशतः अनुदानित शिक्षकांनी शिक्षणाधिकारी डॉ. कारेकर यांचा सत्कार केला. या वेळी मुख्याध्यापक रमेश फरताडे, संतोष काळे, प्रदीप वीर, राजेंद्र पवार, हेमंत आभोणकर, अशोक धनगडे, बद्रीनारायण पाटील, राधेश्याम वारे, अशोक धालगडे, बाळासाहेब इमडे आदीसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट :
“पुणे जिल्ह्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सुमारे १७३९ शिक्षकांना राज्यात सर्वप्रथम वाढीव २० टक्क्यांचा लाभ देता आला, याचा आनंद आहे.”
— डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), पुणे
“अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला वाढीव टप्प्याचा पगार खात्यावर आल्याने आनंद झाला. वाढीव पगाराने विस्कटलेली आर्थिक घडी बसण्यास मदत होईल.”
— रमेश फरताडे, मुख्याध्यापक.






