कामशेतमध्ये पोलिसांचा गांधीगिरीचा अवलंब — रॉंग साईडने जाणाऱ्यांना फुल देऊन जनजागृती

SHARE NOW

कामशेत :

वाहतुकीतील वाढत्या बेफिकीरीवर अंकुश ठेवण्यासाठी कामशेत पोलिसांनी एक आगळीवेगळी आणि प्रेरणादायी मोहिम राबवली आहे. दंडाच्या भीतीपेक्षा जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने पोलिसांनी “गांधीगिरी”चा अवलंब केला. रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या चालकांना थांबवून त्यांना दंड न करता हातात एक सुंदर फूल देऊन नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला. “नियम पाळा, जीव वाचवा” असा मानवतेचा संदेश देत या उपक्रमाने नागरिकांची मने जिंकली आहेत.

 

कामशेत पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी व नागरिक सकाळी कामशेत शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात तैनात झाले होते. शहरात अनेकदा रॉंग साईडने वाहन चालवण्याच्या घटना घडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतूक नियमांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

 

पोलिसांनी वाहनचालकांना थांबवून प्रथम त्यांना शांतपणे नियमभंगाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर हसत मुखाने गुलाबफूल देत सांगण्यात आले “आपण ज्या रस्त्याने चुकीने येत आहात, त्यातून अपघाताची शक्यता वाढते. कृपया नियम पाळा, स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवा.” या सौम्य आणि सकारात्मक संवादामुळे वाहनचालकही हसत प्रतिसाद देताना दिसले.

Advertisement

 

या मोहिमेत अनेकांनी आपल्या चुका मान्य केल्या. काहींनी त्वरित माफी मागून पुढे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी कोणावरही दंडात्मक कारवाई न करता “प्रेमाने समजावणे” या पद्धतीने जनजागृतीचा मार्ग अवलंबला.

 

या उपक्रमात स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनीही सहभाग घेतला. “सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा”, “थांबा, पाहा आणि मग जा” अशा घोषवाक्यांद्वारे जनतेला संदेश दिला. काही पोलिस बांधवानी नागरिकांना फुल देऊन वाहतूक शिस्तीचे महत्त्व पटवून दिले.

 

कामशेत पोलिस ठाण्याचे ठाणे अमंलदार राजेद्र पवार यांनी सांगितले की, “आमचा उद्देश दंड वसूल करणे नाही, तर नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे. नागरिक जर स्वतःहून नियमांचे पालन करतील, तर वाहतुकीतील अराजकता कमी होईल आणि अपघातांनाही आळा बसेल.”

 

या गांधीगिरीच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही कामशेत पोलिसांचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला असून, नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. “फुलातून दिलेला संदेश दंडापेक्षा अधिक प्रभावी ठरतो,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

 

कामशेत पोलिसांनी पुढील काळात अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमा नियमितपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page