वारकरी सेवा संघाकडून आळंदीत स्वच्छता अभियान इंद्रायणी घाट व प्रदक्षिणा मार्गाची स्वयंसेवकांनी केली स्वच्छता
पिंपरी:
वारकरी सेवा संघ आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र आळंदी येथे स्वच्छता अभियानांतर्गत इंद्रायणी घाटाच्या दोन्ही बाजू, तसेच आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाची स्वयंसेवकांनी स्वच्छता केली. या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करीत समाधान व्यक्त करण्यात आले.
या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंदवे, पंढरपूर देवस्थानच्या सदस्या माधवीताई निगडे, ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, जिल्हाध्यक्ष संजय महाराज बोरगे, विलास बालवडकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.
या अभियानात सुमारे 300 स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन अभियानात आपला सहभाग नोंदवला. यावेळी पिंपरी चिंचवड वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, युवराज जगताप, संजय ढोरे, श्रेयस बालघरे, शयान अन्सारी, हर्षल काटे, विरेंद्र गायकवाड, मंगेश कदम, सौरभ चौहान, सोमनाथ झुमके, प्रणव खलाटे, तरुण वर्ग, वारकरी उपस्थित होते. या अभियानाची सांगता इंद्रायणी घाटावर पसायदानाने झाली.
माऊलींचे चोपदार राजाभाऊ रंदवे यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, की संत गाडगेबाबा देशभरात फिरून लोकांना स्वच्छतेबाबत जागरूक करायचे आणि स्वतः परिसराची स्वच्छता करायचे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आजूबाजूचे वातावरण कसे स्वच्छ ठेवता येईल, हे त्यांनी लोकांना सांगितले. लोकसहभाग असेल तर परिसर अस्वच्छ राहणारच नाही.