तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई पाच हजाराची लाच घेताना हवालदाराला अटक
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत मंत्रा सिटी रोडवर एका बियर शॉपीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून एका हवालदाराला पाच हजारांची लाच घेताना पकडले.
याप्रकरणी पोलीस हवालदार सतीश अरुण जाधव वय 42 यांच्याविरुद्ध तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे बियर शॉपी चालवत असून त्यांच्या दोन बियर शॉपी आहेत. पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर बियर शॉपी व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी,कोणताही त्रास न होण्यासाठी व खोटे गुन्हे दाखल न करण्यासाठी प्रत्येक बियर शॉपी चे सहा हजार प्रमाणे दोन बियर शॉपी चे एकूण बारा हजार रुपयाची लाचेची मागणी स्वतःसाठी व पोलीस निरीक्षक यांच्यासाठी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचा समक्ष केली असता पोलीस हवालदार सतीश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील कामासाठी तडजोड अंति पाच हजार रुपयांची लाच मागणी करून पाच हजार रुपयाची लाच रक्कम पंचा समक्ष स्वीकारली. सतीश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7,7अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे, ला. प्र. वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.