छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा विकिपीडिया वरील आक्षेपार्ह मजकूर हटवा – महेश हिरामण बारणे
पिंपरी, पुणे (दि. १८ फेब्रुवारी २०२५) विकिपीडिया या संकेतस्थळावर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह, हीन दर्जाचा, दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक मजकूर प्रकाशित केला आहे. आपण तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून हा आक्षेपार्ह व चुकीचा मजकूर प्रकाशित करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी लेखी पत्राद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
या पत्रामध्ये पुढे म्हटले आहे की, छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीची माहिती हेतुपुरस्सर पसरवली जात आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास बदलून विकृतपणे मांडण्याचा प्रकार मुद्दाम केला जात आहे. त्यामुळे समस्त हिंदुस्थानातील लाखो शिव शंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहेत. छत्रपती श्री संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे व समस्त हिंदू जनतेचे गौरवस्थान असून, त्यांच्याविषयी अशा प्रकारे चुकीची माहिती प्रसारित करणे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा कृत्यांमुळे समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
मा. महोदय, सायबर विभागाच्या मदतीने संबंधित मजकूर त्वरित काढून टाकण्यात यावा. तसेच हा चुकीचा मजकूर करणाऱ्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी व भविष्यात अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी देखील कारवाई करावी.