तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू : नागरिकांसाठी पारदर्शक, जलद सेवांचा नवा अध्याय

SHARE NOW

तळेगाव दाभाडे : नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये आपले सरकार सेवा केंद्रा’चे लोकार्पण उत्साहात पार पडले. लोकसेवा हक्क दिनाच्या औचित्याने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या युगातील वेगवान, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवांसाठी हे केंद्र ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजातील गुंतागुंत कमी करून सेवा प्रक्रियेला गती देणे, अर्ज नोंदणीपासून ते मंजुरीपर्यंतची साखळी सुलभ करणे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून सेवा वितरण अधिक परिणामकारक बनवणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून विश्वासाचा पूल उभारणे ही काळाची गरज आहे. सेवा केंद्रामुळे नागरिकांना वेळेत, अचूक आणि पारदर्शक सेवा मिळतील, असे प्रतिपादन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी केले.

Advertisement

 

कार्यक्रमास उपमुख्य अधिकारी ममता राठोड, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकसेवा हक्क विषयक सामुदायिक शपथ घेण्यात आली. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू,अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी केली. प्रशासनातील उत्तरदायित्व, कार्यक्षमता आणि संवेदनशीलता या त्रिसूत्रीवर भर देत सेवा संस्कृती अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी केले. नव्या उपक्रमामुळे तळेगावकरांना शासकीय सेवांचा ‘स्मार्ट’ अनुभव मिळणार असून, नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page