धिरेंद्र शास्त्रींच्या विधानावर इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे आक्रमक; इतिहास विकृत केल्याचा आरोप

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :बागेश्वर धामच्या धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शिवरायांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रात नवे वादळ उठले. समाज माध्यमांवर हा मोठा चर्चेचा विषय झाला. संपूर्ण महाराष्ट्र सहित भारतातील सर्व जनसामान्यांच्या हृदयात शिवछत्रपतींचे स्थान कालातीत आहे व राहील. या चर्चेत फक्त इतिहासप्रेमी वा शिवप्रेमी सहभागी झाले नाहीत तर सर्व जातीपातीतील मंडळीनी उत्स्फूर्तपणे आपापली मते अर्थात महाराजांच्या वरील श्रद्धा व्यक्त केल्या. महाराज साहेबांच्या निर्वानास आज 346 वर्षे झाली. एवढ्या वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर त्यांचे जनसामान्यांच्या हृदयातील स्थान कायम अग्रगन्य राहिले तथा राहील हे या निमित्ताने अधोरेखित होत आहे.

महाराष्ट्राबाहेरील अर्थात उत्तरेतील लोकांना इथे आल्यावर शिवाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केलेच पाहिजे याची जाणीव होते. मात्र इतिहास अभ्यास, संशोधकीय वृत्ती प्रत्येकाची नसल्याने जुजबी माहितीवर ओघाओघात आणि रंजक पद्धतीने मांडणी सुरु होते तदनंतर प्रचंड टाळ्या मिळाल्याने या वक्तव्यात वाढ होऊन अनैतिहासिक, विनासंदर्भ इतिहास सांगितला जातो. धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडून असे वक्तव्य केले गेले. “शिवाजी महाराज खूप थकले, मला युद्ध करायची नाहीत, माझ्याकडून युद्ध लढले जाऊ शकत नाही, मला विश्राम – आराम हवा आहे. मला काही दिवस काहीच करायचे नाही…” अशी वाक्ये इतिहासात कुठेही नमूद नाहीत मग ही आली कुठून? हा मनाचा इतिहास धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी बोलून दाखवला. हे नक्कीच समर्थनिय नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शांततेचा नाही. तसेंच विरोधाभास देखील किती मोठा झाला हे तपासले पाहिजे. समर्थ रामदास यांच्या लेखणीत देखील राजाने शांतताप्रिय असावे असे कुठे नमूद नाही. मनुष्य शांत नसावाच असे सांगताना समर्थ रामदास म्हणतात, “सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे…”

“सकळ लोक एक करावे, गनिम निवटूनी काढावे, येणे करिता कीर्ती धावे दिगंतरी…”

“आधी गाजवावे तडाखे, तरी मग भुमंडळ धाके, ऐसे न करिता धक्के राज्यास होती…”

“बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करुनी घसरावे म्लेच्छावरी…”

सुनील चिंचोळकर यांची “समर्थांची 24 पत्रे” हे पुस्तक पाहिल्यावर सदर कोणत्याही लेखणीतून समर्थ रामदास यांना शांतता वगैरे अपेक्षित नाही हे निदर्शनास येते. नरहर कुरुंदकर म्हणतात, “राजाने संत बनायचे नसते, उपवास धरायचा नसतो, शांतता राखणे त्याचे काम नाही मात्र उपवास धरणाऱ्या सामान्य प्रजाजनांचे आणि सज्जनांचे रक्षण करणे हा त्याचा धर्म होय. समर्थ रामदास अध्यात्मिक क्षेत्रात कितीही मोठे असले तरी छत्रपती होऊ शकत नाहीत ही रामदासांची मर्यादा आहे…” अर्थात सज्जनांच्या रक्षणासाठी साधू संत कितीही मानवतेचा वा ईश्वरी संदेश देणारे असले तरी मुघलांच्या आक्रमणात राजाच्याच छत्राखाली आसरा घेणे त्याना क्रमप्राप्त असते हे नाकारून चालणार नाही. या देशीचा प्रमुख समकाळात राजाच असतो, संतांचा उपदेश नक्कीच पाठबल देणारा असला तरी त्यांचे रक्षण राजालाच करावे लागत असतें.

Advertisement

“शांतता फक्त मृत लोकांची असते” (Only the dead have seen the end of war / Only the dead have peace) हे प्रसिद्ध विधान प्लेटो या प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञाचे मानले जाते. जगभरात कर्तृत्ववान लोक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जन्माला आलेले नसतात. निवडलेल्या विषयात पराक्रमाचे तमाशे गाजवायचे हे त्यांना ठाऊक असते. शिवाजी महाराज यांना उणे 50 वर्षांचे आयुष्य मिळाले त्यातील 18306 दिवसांतील बालपण सोडता विश्राम – आराम तथा शांतता त्यांच्या व पुढील काळात छत्रपती संभाजी महाराज यांच्या ठाई कधीही नव्हती हे इतिहास संशोधक म्हणून अधिकारवाणीने मी सांगेन. याविषयीचे अगदी बोलके पत्र 11 जून 1670 रोजी मुंबई इंग्रजानी सुरतच्या हेड ऑफिसला पाठविले होते त्यात, “शिवाजी मोगली फौजेप्रमाणे आळशी नाही. कारण शिवाजी हा फक्त सूर्य प्रकाशात गवत वाळवतो असे नसून झोड पावसाने सूर्य अच्छादून गेलेला असतानाही तो गवत वाळवतो. त्याच्या उद्योगास निसर्ग थांबवू शकत नाही…” एवढ्या चपखळ शब्दात महाराज साहेबांचा सातत्य आणि कार्यमग्नतेचा स्वभाव समोर येतो, या स्वभावात शांततेला स्थान नाही हे अधोरेखित होत आहे.

सारांश अध्यात्मिक जगात धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे मोठे स्थान त्यांनी स्वतःनिर्माण केलेले आहे. राष्ट्राविषयी प्रेम आणि धर्माविषयी आस्था त्यांनी जनमानसात निर्माण केली. अनेक सामाजिक उपक्रम चांगले राबवले. त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानाबद्दल कुणीही शंका घेऊ नये मात्र इतिहास हा वेगळा विषय आहे. त्याबाबत उथळ व अनैतिहासिक वक्तव्य कुणी साधू-संतांनी करू नये. सातत्याने अनेक नेते – कार्यकर्ते वा साधू – संत इतिहास मांडतील तर इतिहास अभ्यासकांनी अध्यात्म आणि राजकारण याकडे वळायचे का हा प्रश्न उपस्थित होतो. कोणतीही व्यक्ती स्वतः आपल्याला आवडत्या विषयाचा ध्यास घेऊन कार्यक्षेत्र निवडत असते मात्र खरी साधना तथा तपश्चर्या त्या त्या निवडलेल्या क्षेत्रात संपूर्ण आयुष्य घालवून करायची असते. अलीकडे बहुतांश मंडळींची असंबंधित बाबींवर भाष्य करण्याची स्पर्धा लागलेली दिसून येते. यातून एका उथळ आणि कामचलाऊ अशा अभ्यासक म्हणवून घेणाऱ्याने अकलेचे तारे तोडले, “समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज समकाळातील नव्हते… ” असे वक्तव्य केले त्याची देखील कीव करावी तेवढी थोडीच आहे. यातून कायम चुकीचा इतिहास मंडणाऱ्यांचे फावते आणि एखादा संदर्भ उचलून पूर्ण चळवळ, खरा इतिहास बदनाम करण्याची स्पर्धा सुरु होते. यासाठी तुकोबारायांचा अभंग प्रत्येकाने आपल्या हृदयात कोरून ठेवावा, “नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण? !!!

अनुभव तेथे पाहिजे साचार, न चलती चार आम्हापुढे !!!

वरी कोण मानी रसाळ बोलणे, नाही झाली मने ओळखी तो !!

निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाली !

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे नाही काम !

जे काम आयुष्यासाठी निवडले तेच प्रत्येकाने करावे इतरांच्या कार्यक्षेत्रात अति फसगत संभवते. यापुढे कुणीही शिवचरित्र विषयक भाष्य करताना अगदी जबाबदारीने व अभ्यासकांच्या मदतीने मांडणी करावी हे प्रस्तुत प्रसंगी अभिप्रेत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page