इंद्रायणी ज्युनिअर कॉलेजचा जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत डंका — विवेक ठोंबरेला सुवर्ण, सोहम असवलेला रौप्यपदक
तळेगाव दाभाडे :श्री बालाजी युनिव्हर्सिटी, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३ व ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
कला शाखेचा विद्यार्थी विवेक ठोंबरे याने उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत सुवर्ण पदक पटकावले, तर विज्ञान शाखेचा विद्यार्थी सोहम असवले याने दमदार खेळ करत रौप्य पदकाचा मान मिळवला. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा क्षेत्रात उजळले आहे.
या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे व उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे क्लब प्रशिक्षक गोरख काकडे आणि क्रीडा शिक्षक प्रा. योगेश घोडके यांनी या दोघा खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांच्या मेहनतीमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी साधता आली, असे सर्वांनी नमूद केले.
सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या या तरुण खेळाडूंचे तळेगाव परिसरात तसेच कॉलेज परिवारात सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.






