मनातील विविध भावनांचे रंग उधळून जी भूमी सजवली जाते ती रंगभूमी – ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 

“आपण नुसत्या डोळ्यांनी व्यक्त होत असलेल्या आनंद, दुःख, नाराजी या भावनांना दोन हात अणि पायांची जोड मिळाल्यास आपण एकमेकांशी उत्तम संवाद साधू शकतो. मनातील भावना रंगभूमीवर कलावंत आपल्या भुमिकेमधून जिवंत करतो. शब्द हा रंगभूमीच्या विकासाचा आधार आहे. त्यामुळे वाचिक अभिनयाला महत्त्व आहे. एकमेकांमधील हरवत चाललेला संवाद परत सुसंवाद झाला तर कलेला बहर येऊन नटराज प्रसन्न होईल. ” असे मत ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांनी व्यक्त केले. येथील कलापिनी सांस्कृतिक केंद्रात बुधवार. दि.५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कलापिनीत खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जाणकार अणि रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद आणि टाळ्यांच्या कडकडाटात रंगभूमी दिन साजरा झाला.

दोन घंटा झाल्यानंतर नाट्य देवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून उपस्थित मान्यवर अभय लिमये आणि त्यांच्या पत्नी रेखा लिमये तसेच कलापिनी कार्यकारणी सदस्य यांच्या हस्ते नटराज पूजन संपन्न झाले. त्यानंतर विनायक लिमये आणि त्यांचे सहकारी यांनी बहारदार नांदी सादर करून उत्तम वातावरण निर्मिती केली. नाट्यपूर्ण सुरुवात करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नाट्यकर्मी डॉ. अनंत परांजपे यांनी काळाप्रमाणे १८४३ पासून नाट्य क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती दिली. सर्वांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कलापिनीच्या स्थापनेपासून च्या आठवणी सांगताना प्रेक्षकांमधील कुणीही नाटक करू शकतो असे सांगून ‘ नाटक शिकू या ” या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी कलापिनीच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची जणु आज मुहूर्तमेढ रोवली गेली असे गौरवोद्गार काढले.

Advertisement

उत्तम गीताद्वारे विनायक लिमये आणि विराज सवाई यांनी कलेची देवता असलेल्या नटराजाचे स्तुती गायन करून पुढील कार्यक्रमाची रंगतदार सुरुवात केली. श्रीलक्ष्मी यांनी आपल्या भरत नाट्यम न्रुत्याद्वारे नटराजाची स्तुती सादर केली. कुमार भवनच्या मनवा वैद्य आणि मेधांश पाठक यांनी सादर केलेला मानव -पक्षी संबंधांतील ‘कुहू’ हा नाट्यप्रवेश सर्वांना खूपच भावला. ऋचा पोंक्षे यांनी नाट्यप्रवेशाचे उत्तम निवेदन केले. सौख्यदा गोसावी यांनी उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन केले. आर्या पंडीत हिने पार्श्वसंगीत दिले. किरण खानखोजे यांनी कलापिनीला तबला आणि डग्गा भेट दिल्या बद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर घटस्फोट घेऊ इच्छिणारी महिला अणि समुपदेशक यांच्यातील विनोदी संवादाचे उत्तम सादरीकरण करून अंजली सहस्रबुद्धे अणि केतकी लिमये यांनी धमाल आणली. ” केल्याने होत आहेत रे ” या स्वच्छतेचे महत्व सांगून सद्य परिस्थितीत संत गाडगे बाबाची वेदना सांगणाऱ्या मूकनाट्याने सर्वांची मने जिंकली. याची संकल्पना आणि दिग्दर्शन सौख्यदा गोसावी यांचे होते अणि विशेष सहाय्य अंजली सहस्रबुद्धे, संजय मालकर अणि ऋचा पोंक्षे यांनी केले. नेपथ्य सुप्रिया खानोलकर यांचे होते. हास्य योगी ज्येष्ठ ते छोटी कुमार भवन कलाकार अशा सर्वाचा सहभाग होता. कुमार भवनच्या “दिन दिन दिवाळी ” या नृत्याने कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. त्यानंतर सध्या गाजत असलेल्या दशावतार या चित्रपटातील ” रंग पूजा ” या भैरवी चे प्रभावी सादरीकरण अनिकेत जोशी अणि सुमित वाजपे यांनी केले. श्लोक म्हणून या दर्जेदार कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता दिवेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलापिनीचे सर्व गुणी कलाकार तसेच उत्तम ध्वनी संयोजन करणारे चेतन पंडीत, मानस लोणकर आणि हितेश शिंदे यांचे विशेष सहाय्य लाभले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page