पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती
पुणे :
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षकपदी संदीप सिंग गिल्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले पंकज देशमुख यांची पदोन्नती होऊन त्यांची नियुक्ती पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी आता संदीप सिंग गिल्ल यांची बदली करण्यात आली आहे.
संदीप सिंग गिल्ल सध्या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असून, एक कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे शहरात अलिकडे गाजलेल्या कोयता गॅंगविरोधातील मोहिमेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आक्रमक आणि प्रभावी भूमिका बजावली आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला रोखणे, कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे आणि नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वृद्धिंगत करणे ही त्यांच्या पुढील कार्यकाळातील प्रमुख जबाबदाऱ्या असतील. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी ते कोणती धोरणं राबवतात आणि यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संदीप सिंग गिल्ल यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात नव्या उर्जेसह कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याकडेही त्यांचा भर राहणार आहे.