*तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण* आमदार शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

SHARE NOW

तळेगाव दाभाडे, १८ मे –

 

मावळ तालुक्यातील नागरिकांना अधिक वेळेवर, सुरक्षित आणि सुटसुटीत सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने तळेगाव दाभाडे बस आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच एसटी बसगाड्यांचे लोकार्पण आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते आज (रविवारी) संपन्न झाले. या कार्यक्रमात स्थानिक नागरिक, आगारातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे एसटी डेपोचे व्यवस्थापक प्रमोद धायतोंडे, हरीश कोकरे, प्रकाश हगवणे, विशाल काळोखे, शैलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लोकार्पणानंतर आगारातील विविध विभागांची पाहणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

Advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मावळ तालुक्यासाठी नव्या बसगाड्यांची मागणी आमदार शेळके यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन विभागाने मावळ तालुक्याला १० नव्या बसगाड्या मंजूर केल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ५ गाड्यांचे लोकार्पण या वेळी करण्यात आले. उर्वरित गाड्या लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकार्पणप्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे आगारातील व्यवस्थापक, चालक, वाहक, तिकीट निरीक्षक यांच्याशी चर्चा करून आगाराच्या अडचणी, सेवांमधील अडथळे, तसेच प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. बससेवा अधिक चांगल्या प्रकारे चालाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा झाली.

या नव्या बसगाड्यांमुळे तळेगाव, लोणावळा, पुणे, आंबेगाव, मुळशी परिसरातील प्रवाशांना अधिक नियमित व वेळेवर सेवा मिळणार असून, मावळातील ग्रामीण व शहरी भागांमधील दळणवळण सुलभ होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी आमदार शेळके व परिवहन विभागाचे विशेष आभार मानले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page