मावळात मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी पाच दिवसीय हरितगृह व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्ग प्रवर्गातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी पाच दिवसीय निवासी ‘हरितगृह व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम’ १ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाला आसपासच्या तालुक्यांमधील मागासवर्गीय शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर, हवामानातील अनिश्चितता आणि पीकपद्धतीतील बदल लक्षात घेता हरितगृह तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या पाच दिवसीय प्रशिक्षणात हरितगृहाची रचना, हवामान नियंत्रण प्रणाली, सिंचन तंत्र, पोषण व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन, बाजारपेठ विश्लेषण तसेच मूल्यवर्धित उत्पादनांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यासोबतच प्रत्यक्ष प्रदर्शन, तज्ञांचे मार्गदर्शन आणि हरितगृहातील कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना संस्थेमार्फत मान्यता प्राप्त प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी पात्रता :
(१) प्रशिक्षणार्थी मागास प्रवर्गातील असावा.
(२) प्रशिक्षणार्थी किंवा त्याच्या वडिलांच्या नावे सातबारा उतारा असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणाचे ठिकाण :
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था,
सर्वे नं. ३९८–४००, सीआरपीएफ कॅम्प शेजारी, जुना पुणे–मुंबई महामार्ग,
तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे – ४१०५०६
प्रशिक्षणासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू असून इच्छुक शेतकऱ्यांनी आपली जागा निश्चित करण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा
१) विश्वास जाधव – ९४२३०८५८९४
२) राजू गायकवाड ९७६६०८९००१
या उपक्रमामुळे मावळ व परिसरातील अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख होऊन स्वावलंबनाच्या दिशेने नवी वाट खुली होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






