खड्ड्यांचा रस्ता की रस्त्यात खड्डे? टाकवे–राजपुरी मार्गाची दुर्दशा आणि प्रशासनाची बेफिकिरी
मावळ :
मावळ तालुक्यातील टाकवे–राजपुरी हा रस्ता आज प्रवाशांसाठी नव्हे, तर खड्ड्यांच्या अभ्यासकांसाठी ‘मैदान’ बनला आहे. रस्ता म्हणावा तर कुठे? चारचाकी गाडी चालवताना टायर खड्ड्यात जातो की खड्डा गाडीत येतो, हेच कळत नाही.पावसाळा संपून महिना उलटला, पण या रस्त्याची दुरवस्था मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासन मात्र ‘विकासाच्या’ घोषणा देण्यात आणि निविदांच्या फाइलमध्ये गुतलेले आहे.
अवजड वाहनांच्या अखंड वाहतुकीमुळे या रस्त्याची हाडं मोडली आहेत. दगड, वाळू, सिमेंट, लोखंड वाहून नेणारे ट्रक दिवस-रात्र धावत असतात. वजनाच्या ओझ्याने रस्त्याचे डांबर उखडलं, खड्डे तयार झाले, आणि त्यात दररोज वाहनं घसरून पडत आहेत. ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असला तरी प्रशासनाचे कान बहिरेच झालेत. रस्त्यावर चालणं म्हणजे आता अक्षरशः धोक्याचं आमंत्रण आहे.
दुचाकीस्वारांचा जीव मुठीत, शाळकरी मुलं दररोज भीतीने प्रवास करतात, तर रुग्णवाहिका देखील या रस्त्यावर रांगत चालावी लागते. ही परिस्थिती २१व्या शतकातील ‘स्मार्ट’ महाराष्ट्राची लाज आहे.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या मोठ्या गाजावाजाने आश्वासने दिली गेली. “काम तातडीने सुरू होईल,” अशी घोषणा करण्यात आली. पण आता पावसाळा संपला, रस्ता मात्र अजूनही खड्ड्यांनी सजलेला आहे. विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या साध्या रस्त्याची काळजी घेऊ शकत नाहीत का? की इथे जनतेच्या सुरक्षिततेपेक्षा कंत्राटदारांच्या बिलांनाच प्राधान्य दिलं जातं?
प्रशासनाचे उदासीन धोरण आणि लोकप्रतिनिधींचा मौनव्रत या दोघांच्या संगनमतामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी अनेकदा लेखी तक्रारी दिल्या, आंदोलनाचा इशाराही दिला, पण तरीही काही हालचाल नाही. जणू लोकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जातेय.
रस्ते म्हणजे विकासाच्या शिरा असतात. त्याच शिरेत जर खड्डे भरले तर विकासाचं रक्तप्रवाह थांबतो. मावळ तालुक्यातील हा रस्ता त्याचं जिवंत उदाहरण आहे. रस्त्यांची दुरवस्था ही केवळ प्रशासनाची चूक नाही, तर समाजाच्या सहनशीलतेचीही परिणती आहे. आपण रस्त्यातील खड्डे गप्पपणे सहन करत राहिलो, तर उद्या तोच खड्डा आपल्या प्रणालीत कायमचा बसून जाईल.
आता वेळ आली आहे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ठामपणे आवाज उठवावा. विकासाच्या घोषणांवर नव्हे, तर रस्त्यांच्या वास्तवावर प्रश्न विचारावेत. कारण हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, तर शासनाच्या संवेदनशीलतेचा आहे. आणि जर शासन संवेदनाहीन झाले, तर लोकशाहीचा रस्ता सुद्धा खड्ड्यांनी भरून जाणार, यात शंका नाही.






