वडगाव मावळ येथे श्रीमंत सरदार महादजी शिंदे विजय दिन सोहळ्याचे भव्य आयोजन

SHARE NOW

वडगाव मावळ :

मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासातील पराक्रमी योद्धा व मुत्सद्दी श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या शौर्याचा गौरव करणारा विजय दिन सोहळा वडगाव मावळ येथे सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने धार्मिक, प्रबोधनात्मक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर ऐतिहासिक वातावरणाने भारावून जाणार आहे.

 

सोहळ्याची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या मूर्तीचे अभिषेक विधी पार पडणार आहेत. या धार्मिक विधीमुळे कार्यक्रमाला पावित्र्यपूर्ण प्रारंभ होणार असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध व्याख्याते सचिन मधुराव ढोबळे यांचे ‘शिवशंभू चरित्र्य’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर आधारित हे व्याख्यान तरुण पिढीला राष्ट्रभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारे ठरणार आहे. यानंतर रात्री ८ वाजता दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी संपूर्ण परिसर दीपप्रकाशाने उजळून निघणार आहे. या कार्यक्रमास नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

 

या विजय दिन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी प्रवीण निकम, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, मोडी लिपी अभ्यासक सचिन सरपाटील तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे राहणार आहेत.

 

या वेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यात येणार आहे. महादजी शिंदे क्रीडा पुरस्काराने रुचिका समीर ढोरे यांना गौरविण्यात येणार असून महादजी शिंदे दुर्गवीर पुरस्कार ‘सफर ३६१ किल्ल्याची’ या सामाजिक प्रतिष्ठानाला प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमुळे क्रीडा, सामाजिक कार्य व दुर्गसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.

 

हा संपूर्ण विजय दिन सोहळा श्रीमंत सरदार महादजी शिंदे उद्यान, वडगाव मावळ येथे पार पडणार असून कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र नथुराम जाधव (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र गिरी भ्रमण संस्था) व समस्त ग्रामस्थ मंडळी, वडगाव मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची आठवण जपत नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा देणारा हा विजय दिन सोहळा अविस्मरणीय ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page