धामणे तिहेरी हत्याकांड प्रकरणी दहा आरोपींना जन्मठेप , नऊ वर्षांनंतर फाले कुटुंबाला न्याय; मावळ तालुक्यात समाधानाची भावना

SHARE NOW

मावळ :

मावळ तालुक्यातील धामणे गावाच्या हद्दीत एप्रिल २०१७ मध्ये घडलेल्या थरारक सशस्त्र दरोड्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयाने दहा आरोपींना एकत्रित जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सात वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या खटल्याचा निकाल बुधवारी जाहीर झाल्याने फाले कुटुंबास न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

 

धामणे येथील शेतवस्तीवर राहणारे नथू विठोबा फाले (वय ७०), त्यांची पत्नी छबाबाई नथू फाले (वय ६५) आणि मुलगा अभिनंदन उर्फ आबा नथू फाले (वय ३२) यांची दरोडेखोरांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. या भीषण घटनेत अभिनंदन यांची पत्नी तेजश्री अभिनंदन फाले (वय २५) आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी अंजली गंभीर जखमी झाल्या होत्या.

 

घटनेच्या रात्री अज्ञात दरोडेखोरांनी फाले कुटुंबाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत झोपेत असलेल्या कुटुंबीयांवर फावड्याने सपासप वार केले. यात नथू, छबाबाई व अभिनंदन यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यातून बचावलेल्या तेजश्री यांनी प्रसंगावधान राखत घराबाहेर धाव घेत जवळील नागरिकांकडून मदत मिळवली. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

Advertisement

 

या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी केला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातून दहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

 

नागेश्वर भगवान भोसले, बापू तुकाराम काळे, भेन्या जिंद्या चव्हाण, सेवन प्याव लाभ, दिलीप पांडू चव्हाण, सुपार प्याव चव्हाण, राजू तुकाराम शिंगाड, अजय शिवाजी पवार, योगेश बिरजू भोसले आणि दीपक बिरजू भोसले (सर्व रा. अहिल्यानगर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता स्मिता चौगुले यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींविरोधात सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळ पंचनामे तसेच जप्त करण्यात आलेली हत्यारे न्यायालयात दाखल करण्यात आली.

 

निकाल देताना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी आरोपींचा गुन्हा अत्यंत गंभीर, क्रूर आणि समाजमन हादरवणारा असल्याचे नमूद करत दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सहायक फौजदार बाळासाहेब गवारी, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश गोरे व राजेश्वरी सदगीर यांनी प्रभावी कोर्ट पैरवी केली.

 

या निकालामुळे मावळ परिसरात पोलिसांच्या कसून तपासाबाबत आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page