आदर्श सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांना राज्यस्तरीय ‘ग्रामसमृद्धी सन्मान २०२६’ मावळच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; पुण्यात पुरस्कार प्रदान

SHARE NOW

मावळ

 

मावळ तालुक्यातील कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत उत्कृष्ट कामगिरी करणारे आदर्श सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय अरविंद ढुमणे यांना राज्यस्तरीय ‘ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६’ अंतर्गत सन्मानित करण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवन येथे आज (दि. २० जून) झालेल्या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नालंदा संस्थेच्या ‘ग्रामसमृद्धी मंच’तर्फे राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात शेतकरी मार्गदर्शन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक व्यवस्थापन, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील कृषी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अक्षय ढुमणे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Advertisement

 

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणे, कृषी विभागाच्या योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना सुचविणे या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा लाभ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना झाला आहे.

 

पुरस्कार स्वीकारल्यानंतर अक्षय ढुमणे यांनी हा सन्मान शेतकरी बांधव, सहकारी अधिकारी-कर्मचारी, कुटुंबीय आणि मार्गदर्शक यांच्या प्रेरणेचे फलित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अधिक जोमाने शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या राज्यस्तरीय सन्मानामुळे मावळ तालुक्याचा गौरव वाढला असून विविध क्षेत्रातील मान्यवर, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधवांकडून अक्षय ढुमणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल मिळालेला हा सन्मान तरुण अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page