कलापिनी ‘रंगवर्धन २०२५’ शुभारंभ उत्साहात संपन्न नाट्य रसिकांसाठी कलापिनीचा विचारांना चालना देणाऱ्या नाटकांचे सादरीकरण करणारा उपक्रम …….
तळेगाव दाभाडे :
बुधवार दि. ६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्रात शं वा.परांजपे नाट्यसंकुलात कलापिनी ‘रंगवर्धन २०२५’ या वर्षाचा शुभारंभ महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सध्या तुफान गाजत असलेल्या ‘ये जो पब्लिक है’ या नाटकाने झाला. रसिक प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. प्रेक्षकांना नेहेमीपेक्षा वेगळी, प्रभावी मांडणी, विचाराला चालना देणारी अशी नाटके पहायला मिळावीत याकरता गेल्या वर्षीपासुन कलापिनीत रंगवर्धन प्रायोगिक नाटयचळवळ सुरु झाली आणि याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. हा प्रतिसाद यावर्षीही वाढताच राहिला.
उद्घाटन प्रसंगी प्रसिद्द्ध अभिनेते आनंद इंगळे, सुनिल अभ्यंकर आणि गायत्री तांबे – देशपांडे, शुभांगी दामले, कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, उपाध्यक्ष अशोक बकरे, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, विश्वस्त डॉ अनंत परांजपे, विनायक भालेराव, डॉ. विनया केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी स्वागत केले. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रसिक प्रेक्षकांना उत्तमोत्तम कलाकृती पहायला मिळणार असल्याचे विश्वस्त डॉ. परांजपे यांनी सांगितले. “कलापिनीशी माझा बालनाट्यापासून अनेक वेळा संबध आला आहे. आजच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद पाहुन मला खुप आनंद झाला” असे आनंद इंगळे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. विराज सवाई यांनी सूत्रसंचालन केले.
नाटक नेहमीपेक्षा वेगळे आणि छान होते. एकाच नाटकात अनेक विषयांची मांडणी होती. प्रेक्षकांचे मत घेऊन पुढे सरकत असलेले नाटक पाहताना रसिकांना वेगळा आनंद मिळत होता. आनंद इंगळे, सुनिल अभ्यंकर आणि गायत्री तांबे – देशपांडे या तीनही कलाकारांचे अभिनय वाखाणण्याजोगे होते. विवेक बेळे यांचे लेखन आणि दिग्दर्शन उत्तम होते.
एकंदरीत कलाकार- प्रेक्षक संवादावर पुढे जाणाऱ्या या नाटकाने जाणकार रसिक प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिला.